गुटख्याची खुलेआम अवैध विक्री
By admin | Published: November 8, 2016 12:42 AM2016-11-08T00:42:46+5:302016-11-08T00:42:46+5:30
छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.
एफडीएचे दुर्लक्ष : अन्न सुरक्षा मानद कायद्याची पायमल्ली
भंडारा : छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया थांबल्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांमुळे गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. शहरात गुटख्याचे व्यापारी नसले तरी साठा करणारे मात्र आहेत. त्यांच्याकडूनच किरकोळ व्यापारी गुटख्याची खरेदी करतात. त्यामुळे शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे.
भंडारा शहरासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी खर्राविक्री जोरात सुरू आहे. पूर्वी १० रूपयाला मिळणारा खर्रा आता २० रूपयाचा झाला आहे. भंडारा शहरात दिवसाला खर्रा विक्रीची उलाढाल लाखांवर आहे. अनेक पानठेला व्यावसायिक हाताने खर्रा घोटण्याऐवजी आता मशिनचा वापर करू लागले आहे. मोठ्या प्रमाणावर सुपारी, तंबाखू, चुना याचे मिश्र्रण तयार करून दिवसभरात ५० किलोहून खर्रा विकला जातो. यात शाळकरी मुले, महिला यांचेही खरेदीदारांमध्ये अधिक प्रमाण आहे. भंडारा शहरात सर्वच शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर पानठेल्यातून खर्रा विक्रीचे काम सुरू आहे. मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा या पानठेला दुकानाविरूद्ध कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)