मोहगाव येथे अवैध वाळू व्यवसाय जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:42 PM2019-07-04T21:42:24+5:302019-07-04T21:43:02+5:30
तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे मागील एक वर्षापासून एकाही महसूल अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे मागील एक वर्षापासून एकाही महसूल अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही.
गत काही दिवसात जिल्हा खनिकर्म अधिकारी भंडारा यांनी अनेक ठिकाणी अवैध वाळू व्यावसायिकावर कारवाई केली. त्यामुळे त्यांनी मोहगाव टोली येथे अवैध वाळू व्यवसायिकांवर कारवाई करून अवैध वाळू चोरी थांबवावी, अशी मागणी मोहगाव देवी, रोहणा येथील अनेक नागरिकांनी केलेली आहे. पहाटेला पाच वाजतापासून ट्रॅक्टरद्वारे नदीमधील वाळू जमा करून ती वाघमारे यांच्या शेतात जमा केली जाते.
दररोज सकाळी व सायंकाळी तीन जेसीबीने मोठ्या प्रमाणात टिप्पर भरून ही रेती नागपूर येथे विक्रीसाठी पाठविली जाते.
या वाळूच्या अवैध व्यवसायात स्थानिक तरुण सुद्धा गुंतलेले आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यापासून आतापर्यंत याठिकाणी एकदाही कारवाई झालेली नसल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढलेले आहे. सर्वच विभागाचे हात ओले झालेले असल्याने कारवाई होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या क्षणी सुद्धा वाघमारे यांच्या शेतात १०० टिप्परच्या जवळपास वाळू साठा जमा केलेला आहे. वाळू घेऊन जाणारे टिप्पर बिनबोभाट सुरू आहेत. टिप्पर तलाठी कार्यालयात समोरूनच रात्रंदिवस वाळूची चोरी करून नेत असतानाही तलाठी मूग गिळून बसले आहे.
एखाद्या लिलाव झालेल्या घाटाला ही लाजवेल एवढा मोठा वाळू व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे. तरीही प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. वाळू चोरीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात बुडत आहे स्थानिक वाळू व्यावसायिकांनी वाळूच्या अवैध व्यवसायातून कमविलेल्या पैशातून ट्रॅक्टर, जेसीबी, टिप्पर विकत घेतलेले आहेत. वाळू व्यवसायिकामधील एका मोठ्या व्यावसायिकाने एका अधिकाऱ्याला वातानुकूलित यंत्र घेऊन दिला असल्यानेच कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या वाळूमाफियांना एका लोकप्रतिनिधीचे सुद्धा पाठबळ असल्याचे बोलले जाते. दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायामुळे येथील रस्ते पूर्णत: उखडलेले असल्याने सामान्य नागरिकांना जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रेती व्यवसाय त्वरित बंद करावा व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केलेली आहे.