प्रशासनाच्या अभयात रेतीची अवैध साठवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:40+5:302021-06-16T04:46:40+5:30
गत काही दिवसांपासून तालुक्यातील जवळपास सात नदीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. मात्र, या ...
गत काही दिवसांपासून तालुक्यातील जवळपास सात नदीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. मात्र, या नदीघाटांपैकी टेंभरी, विहीरगाव, आवळी, नदीघाट रेती तस्करांचा जणू अड्डाच बनला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या रेती घाटातून नियमित दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारास बिनधास्तपणे रेतीचा उपसा व वाहतूक केली जात आहे. शासन-प्रशासनाच्या कारवाईची भीती न बाळगता नियमित रेतीचा उपसा केला जात असल्याने या नदीघाट परिसरात रेतीचे डोंगर दिसून येत आहेत.
तथापि, काही रेती तस्करांकडून थेट नदीपात्रात पोकलँड मशीनद्वारे रेतीचा उपसा व टिप्परद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याची ओरड आहे. दरम्यान, या सबंध गैरप्रकाराची माहिती तहसील प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला होऊनही अवैध रेतीसाठा जप्ती व उपशासह वाहतुकीसंबंधाने प्रशासकीय स्तरावरून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने रेती तस्करांना प्रशासनाचेच अभय असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.
याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अभयात रेती तस्करांनी केलेला रेतीचा अवैध साठा जप्त करण्यासह टेंभरी विहीरगाव नदीघाटातून होणारी रेतीची तस्करी थांबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.