रेतीच्या अवैध वाहतुकीने रस्त्याची ‘ऐशीतैशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:17+5:302021-09-21T04:39:17+5:30
२० लोक १० के भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की ...
२० लोक १० के
भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हेच समजेनासे झाले आहे. एवढी विदारक व दयनीय अवस्था ढिवरवाडा ते डोंगरगाव या तीन किलोमीटर रस्त्याची झालेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.
शासन नेहमी रस्त्याच्या मजबुतीकरिता व नियमित सुरळीततेकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी बांधकाम विभागामार्फत पुरवितो. मात्र, बरेचदा शासनाचा निधी रस्त्यावर न पडता कागदावरच आलबेल दाखविला जातो. असाच काही प्रकार ढिवरवाडा ते डोंगरगाव या रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे. या रस्त्याला बांधकाम विभागाने अभ्यासात घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हितार्थ बांधकाम करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकऱ्याला साधे पायीसुद्धा चालणे कठीण झाले आहे. या परिसरात शासन पुरस्कृत व स्वतंत्र शेती पुरस्कृत शेतकरी बागायत शेती करीत आहेत. त्यांना भाजीपाल्याची ने आण करण्याकरिता हा एकच मार्ग आहे. अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे अपेक्षित वेळेत बाजारपेठेत पोहोचता येत नसल्याने शेतकऱ्यांची सुमार नुकसान होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा डोळेझाक केल्याने शेतकऱ्यासह सामान्य माणूससुद्धा संकटात आलेला आहे.
वैनगंगा नदीच्या पात्रात शुभ्र रेती सहजतेने उपलब्ध आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीत रेती अत्यंत महत्त्वाची खनिज आहे. जिल्हा खनिकर्म, पोलीस विभाग अपेक्षित लक्ष देत नसल्याने या घाटावरून रेतीची वाहतूक अवैधपणे सुमार सुरू आहे. चोरटी वाहतूक असल्याने बिनबोभाट दिवस-रात्र सुरू आहे. अशा जड वाहतुकीने रस्ता संपूर्णत: खचला असून, मातीमोल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याविना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
डोंगरगाव, ढिवरवाडा हे दोन्ही गाव वैनगंगातीरी वसलेले आहेत. येथील बऱ्याच कुटुंबात रेती तस्करीचा धंदा जोमात आहे. गावातील पदाधिकारीसुद्धा रेती तस्करीत पुढे आहेत. पदाधिकाऱ्यांचे तीन किलोमीटर रस्त्यावर लक्ष न उरल्याने रस्त्याला खाच खड्ड्यांसह चिखल पसरला आहे. यापूर्वी या रस्त्यावर पडलेली गिट्टीसुद्धा परिसरातील नागरिकांनी चोरली. त्यामुळे हा रस्ता फक्त कागदावरच दिसत आहे. बांधकाम विभाग भंडारा यांनी या रस्त्याची चौकशी करून शक्य तितक्या लवकर शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.