हॉटेल, चहा टपऱ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा बिनधास्त वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 01:50 PM2024-04-24T13:50:50+5:302024-04-24T13:54:20+5:30
Bhandara : दरवाढीचा परिणाम : गैरप्रकारावर संबंधित यंत्रणांनी करावी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासोबत ग्रामीण भागातही हॉटेल, चहा टपऱ्या, रेस्टॉरंट आदी ठिकाणी तसेच वाहनांत सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहेत. विशेष म्हणजे रहदारीच्या ठिकाणी उघड्यावर सिलिंडर वापरले जात आहेत. त्यामुळे अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेकडून कारवाई होण्याची गरज आहे. परंतु, धाडसी कारवाया होत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.
भंडारा शहरातील मोठा बाजार, महामार्ग परिसर, बसस्थानकासमोरील परिसरात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करतात. गॅस वापरताना त्यांच्याकडून फारसी सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते. अनधिकृत सिलिंडर विक्रीही केली जात आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी शासनाच्यावतीने सवलती दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी असतात. त्याचाच गैरफायदा व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. पुरवठा विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे. व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.
गॅस सिलिंडरचा गैरप्रकार कुणाकडून?
• व्यावसायिकांकडून अधिक नफा कमावण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. वितरक, ग्राहक आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी या माध्यमातून गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण थेट वितरकांशी संपर्क करून तर काही जणांकडे कुटुंबातील सदस्यांच्या नावे दोन ते तीन कनेक्शन असल्याने त्यांच्याकडून खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅस सिलिंडरचे सध्याचे दर असे
सिलिंडर वजन (किलोग्रॅम) दर
घरगुती १४.२ ८६३
व्यावसायिक १९ १९५४
फ्लेम प्लस १९ १९७४
ग्राहकांना वर्षभरात किती सिलिंडर?
• एका कुटुंबाला किंवा एका कनेक्शनधारकास एका वर्षासाठी १२ सिलिंडर दिले जातात. यापेक्षा अधिक सिलिंडरची आवश्यकता असेल तर आणखी ३ सिलिंडर, असे १५ गॅस सिलिंडर दिले जाऊ शकतात. मात्र, त्या तीन सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी ही प्रणाली अस्तित्वात आहे.