‘मग्रारोहयो’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:15+5:302021-05-31T04:26:15+5:30
* ठाकचंद मुंगूसमारे * गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन तुमसर : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणाऱ्या वैयक्तिक ...
* ठाकचंद मुंगूसमारे
* गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
तुमसर : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आता ग्रामपंचायत स्तरावर ‘मग्रारोहयो’अंतर्गत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पंचायत समितीने सदर योजनेची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी रायुकॉं तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याच्या १२ एप्रिल, २०१८ रोजीच्या शासन निर्णय होता. त्यात असलेल्या अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत होते. परिणामी शासनाच्या नियोजन विभागाने (रोहयो) ३० सप्टेंबर २०२० रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर फळबाग व वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार निश्चित करण्याबाबतचे नवीन परिपत्रक काढले. त्यातील नमूद अटी रद्द करून त्यांमध्ये ‘सदर कामे ग्रामपंचायतीकडून करून घेण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याबाबत पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्याने तांत्रिक मान्यता द्यावी; तसेच प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावी,’ अशा सुधारणांचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र अजूनपर्यंत त्यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी तत्काळ परिपत्रकानुसार अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ तत्काळ मिळवून द्यावेत, अशी मागणी गटविकास अधिकारी धीरज पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी रायुकॉं तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, शुभम गभने, कार्तिक देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.