स्टेट बँक ते पटाची दान हा रस्ता तत्काळ मोकळा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:10+5:302021-09-11T04:36:10+5:30
नागरिकांना होतोय त्रास : उड्डाणपूल कामादरम्यान रस्ता बंद साकोली : गत तीन वर्षांपासून साकोली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...
नागरिकांना होतोय त्रास : उड्डाणपूल कामादरम्यान रस्ता बंद
साकोली : गत तीन वर्षांपासून साकोली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान स्टेट बँक पटाच्या दानकडे जाणारा रस्ता नेहमीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांत मोठा संताप असून, हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील , ते आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. उड्डाणपुलाच्या कामादरम्यान साकोलीच्या मुख्य रस्ता असलेला स्टेट बँक मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. नागरिकांना बाजार व मटण मार्केटमध्ये जाण्यासाठी एककुडी रोड कडून जावे लागते. पूर्वी हा रस्ता मोकळा असल्याने बाजारात जाण्यासाठी स्टेट बँकेसमोरून जाता येत होते. मात्र, उड्डाणपुलाच्या कामादरम्यान हा रस्ता बंद करण्यात आला. त्या वेळेस नागरिकांनी याला विरोध केला होता. मात्र, उड्डाणपुलाच्या कंत्राटदारातर्फे हा तात्पुरता रस्ता बंद करण्यात येत आहे, नंतर हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, रस्ता बंद केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला नाही. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आठ दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. हा रस्ता सुरू करण्यात आला नाही यावरून संबंधित कंत्राटदाराची दादागिरी व एकाधिकारशाही दिसून येत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पटाच्या दांडीवर बाजारासाठी कम्प्लेंट तयार करण्याचे निश्चित केले आहे.
प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा रस्ता तत्काळ मोकळा करण्यात यावा, अन्यथा नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.