जिल्ह्यात दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:51 PM2018-12-17T22:51:55+5:302018-12-17T22:52:07+5:30
जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
२७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील १३२४ शाळांमधून २ लाख २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या मोहीमेची टक्केवारी ८३ आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून २७ डिसेंबर पर्यंत २ लाख ६५ हजार ८४२ विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. गोवर-रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित असून या पूर्वी २२ राज्यांमध्ये १३ कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.
भंडारा तालुक्यात ४९ हजार ७५३, मोहाडी २८ हजार ८६७, तुमसर ४० हजार ६९७, लाखनी २६ हजार ३९९, साकोली २५ हजार ६, लाखांदूर १९ हजार ५८७ आणि पवनी तालुक्यात ३१ हजार २५ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील १४२८ शाळा आणि १४२७ अंगणवाडी केंद्रातील बालकांना लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. या मोहीमेदरम्यान काही ठिकाणी बालकांना किरकोळ स्वरुपाचा त्रास झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
आराध्याच्या मृत्यूचे कारण अहवालानंतरच कळेल
लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील आराध्या रणजित वाघाये (११ महिने) हिचा मृत्यू झाला. गोवर-रुबेला लस दिल्यानेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र तिचा नेमका मृत्यू कशाने झाला हे वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी दिली. लसीकरणादरम्यान १७० बालकांना सौम्य स्वरुपाच्या प्रतिक्रिया उद्भवल्या होत्या. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आले. दहा लाभार्थ्यांना मध्यम प्रतिक्रिया उद्भवल्याने नागपुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याचे डॉ.उईके यांनी सांगितले.