कुपठे बीट पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी
By admin | Published: November 28, 2015 01:45 AM2015-11-28T01:45:09+5:302015-11-28T01:45:09+5:30
शिक्षणाचा अधिकार सन २००९ मध्ये प्राप्त झाला. राज्यातील शिक्षण विभागाने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आखूनही विद्यार्थी अप्रगतच राहत होते.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार : जिल्ह्यातून देव्हाडी बीटाची प्रायोगिक तत्वावर निवड
मोहन भोयर भंडारा
शिक्षणाचा अधिकार सन २००९ मध्ये प्राप्त झाला. राज्यातील शिक्षण विभागाने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आखूनही विद्यार्थी अप्रगतच राहत होते. सातारा जिल्ह्यातील कुपठे बीट राज्यात प्रगत झाले. चंद्रपुर जिल्ह्याातील ताडाली बीटने कुपठे बीटचा किला गिरविला. आता राज्यातील इतर शाळांनी या बीटचा कित्ता गिरवावा लागणार आहे. तुुमसर तालुक्यातील देव्हाडी बीटची निवड प्रगत बीटकरिता झाली आहे.
कुपठे बीटअंतर्गत ४० शाळेत एकही विद्यार्थी अप्रगत नाही ते बीट राज्यात मॉडेल झाले. त्याच धर्तीवर चंद्रपुर जिल्ह्याातील ताडाली बीट प्रगत झाले. यांचा कित्ता राज्यातील इतर जिल्ह्याातील बीट प्रगत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी कुपठे बीट पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय घेऊन तशा सूचना दिल्या. भंडारात नुकतीच त्यांनी भेट दिली. आढावा सभेत त्यांनी भंडारा जिल्ह्यात एक बीट प्रगत करण्याचे निर्देश दिले.
डायट, भंडारा तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तुमसर तालुक्यातील देव्हाडी बीट प्रगत करण्याचा निर्णय घेतला. या बीट अंतर्गत देव्हाडी, मिटेवानी व येरली केंद्रातील जिल्हा परिषदेच्या ४१ शाळांचा समावेश आहे. येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थी प्रगत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रगत विद्यार्थी उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, कार्यशाळा, तंत्रस्रेही कार्यशाळा ज्ञानावर आधारित साहित्य तयार करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गाची क्षमता, भाषा विषयक क्षमता, विद्यार्थ्यांना वाचन घेणे, गणितातील मूलभुत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आदी येणे आवश्यक आहे. नंतर विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली जाणार आहे.
यासंबंधात डायट भंडाराचे प्राचार्य परिहार यांचे मार्गदर्शनात सभा घेण्यात आली. या बैठकीला जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नंदनवार, विस्तार अधिकारी भलावी, वंजारी, आर. एस. बांते उपस्थित होते. या उपक्रमात शिक्षकांना सातारा जिल्ह्याातील कुपठे तथा चंद्रपूर जिल्ह्याातील ताडाली येथे पाठवून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी प्रगत करण्याकरिता शिक्षण विभागाने बराच आटापिटा केला होता. अनेक प्रशिक्षण शिक्षकांना देवून काहीच फायदा झाला नाही. प्रशिक्षण केवळ कागदोपत्री होणे गंभीर आहे. कोणत्याही प्रशिक्षणाचा फायदा होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रगतिसाठी या महत्त्वकांक्षी पॅटर्नची अंमलबजावणी केली असली तरी तो कितपत यशस्वी ठरेल, हे भविष्यात कळेल.