सभागृहात ठराव घेवूनही अंमलबजावणी शून्य
By admin | Published: January 14, 2017 12:31 AM2017-01-14T00:31:03+5:302017-01-14T00:31:03+5:30
सभेच्या नावावर जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी व सदस्यांना बोलविले जाते. सर्वांच्या समक्ष सभागृहात ठराव पारित करून त्याची नोंद प्रोसेडिंगवर होते.
स्थायी समितीत जि.प. सदस्यांचा संताप : विविध मुद्यांवरून सभा गाजली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
भंडारा : सभेच्या नावावर जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी व सदस्यांना बोलविले जाते. सर्वांच्या समक्ष सभागृहात ठराव पारित करून त्याची नोंद प्रोसेडिंगवर होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सभागृहाचा अवमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया आजच्या स्थायी समितीत सदस्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांनी या मुद्याला हात घातला. सभागृहात अध्यक्षांसह सर्व सभापती व समिती सदस्यांचे सम्मतीने ठराव पारित करण्यात येतो. मात्र प्रोसेडींगवर ठराव लिहूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. सोबतच अध्यक्ष व पदाधिकारी यांचे अधिकारी ऐकत नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याने सर्व सामान्यांचे काम कसे होणार, अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सभागृहाचा अवमान टाळण्यासाठी सभा व ठराव घेणे बंद करावे, अशी संतप्त मागणी स्थायी समिती सदस्य रमेश डोंगरे यांनी यावेळी केली.
यानंतर सभागृहात घेतलेल्या ठरावाची प्रोसेडींग दहा दिवसात तयार झालीच पाहिजे, व सर्व विभागाला तो तातडीने पाठवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश या समिती अध्यक्ष भाग्यश्री गिलोकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. ठेकेदारांचे हितसंबंध जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी कमिशनचा मुद्दा आता विसरावा, अशी तंबी कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी सभेतून दिली. हितसंबंधामुळे कामाचा दर्जा निकृष्ठ होत आहे. लघु पाटबंधारे विभागातील कामांच्या अनियमिततेमुळे जिल्ह्याचा सिंचन क्षमतेचा विकास थंडावला आहे. येथील निविदा प्रकरणांमुळे बेरोजगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. जलसंधारणाचे काम तालुकास्तरावरून वितरीत करावे, अशा सुचनाही नरेश डहारे, मनोहर राऊत, प्यारेलाल वाघमारे, धनेंद्र तुरकर यांनी यावेळी सुचविल्या.
राज्य शासनाने एखाद्या योजनेसंदर्भात काढलेला अध्यादेश हा सर्वाेच्च असल्याने त्यानुसार काम व्हायला पाहिजे त्याच्यात कामचुकारपणा करू नये असे नरेश डहारे व शुभांगी रहांगडाले यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
झबाडा व गराडा मामा तलावाचे काम करण्यात आले. त्यात मोठी अनियमितता असल्याचा आरोपही करून डहारे यांनी सभागृहात विषय उपस्थित केला. लघु पाटबंधारे विभागाच्या कामासाठी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला. मात्र काम झाले नसल्याने तो परत पाठविला. अशा कार्यकारी अभियंता पराते यांना परत पाठवावे, असा ठराव घेण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी सभागृहात लावून धरला. यावेळी शिक्षण विभागाच्या संदर्भात प्रतिनियुक्तीचा व बदली प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच आजच्या स्थायी समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी येथील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भोर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांना चांगलेच धारेवर धरले. (शहर प्रतिनिधी)