सोंड्याटोला धरणावरून मोहफुलांची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:00 PM2019-08-20T22:00:54+5:302019-08-20T22:02:09+5:30
सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सीमा आणि सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण बांधकाम मार्गावरून मध्यप्रदेशातून मोहफुलांची आयात सिहोरा परिसरात करण्यात येत आहे. या व्यवसायात बडे आसामी गुंतले आहेत.
रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सीमा आणि सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण बांधकाम मार्गावरून मध्यप्रदेशातून मोहफुलांची आयात सिहोरा परिसरात करण्यात येत आहे. या व्यवसायात बडे आसामी गुंतले आहेत.
मध्यप्रदेश राज्याच्या हाकेच्या अंतरावर सिहोरा परिसरातील गावे आहेत. या राज्यातून अवैध साहित्यांची आयात करण्यात येत असल्याचे कारणावरुन बपेरा आंतरराज्यीय सीमेवर तत्कालीन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पोलीस चौकी मंजूर केली. खासगी घरात ही पोलीस चौकी सुरु करण्यात आली आहे. परंतु पोलीस चौकीला सांभाळणारे पोलीस कर्मचारी नाही. बपेरा बिट सांभाळणारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी देण्यात आली असल्याने एक ना धड, भाराभर चिंध्या अशी अवस्था प्रशासकीय कारभाराची झाली आहे.
पोलीस चौकीमध्ये कर्मचारी नाही. २४ तास चौकी सुरु नसल्याने सीमावर्ती गावात अवैध साहित्याची आयात सीमेवरून वाढली असल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला पोलीस चौकी असल्याने काही दिवस अवैध साहित्य आयातीवर आळा बसला होता. परंतु नंतर स्थिती जैसे थे झाली आहे. सिहोरा पोलीस ठाण्यामध्ये ५३ पदे आहेत. कार्यरत २५ आहेत. काही पदे रिक्त आहेत. यात काही पोलिसांचे स्थानांतरण झाले असता नवीन कर्मचारी आले नाहीत. पोलीस ठाण्यात अनेक पोलीस रूजू होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ऐकविण्यात येत आहेत. यामुळे रिक्त पदाचा अनुशेष वाढत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला जोडणारा धरण बांधकाम करण्यात आले आहे.
अवैध साहित्यांची आयात करण्यासाठी धरण मार्ग सुरक्षित असल्याची पावती अवैध व्यवसायीक देत आहेत. या मार्गावरून मध्यप्रदेशात स्वस्त दरात उपलब्ध होणारा मोहफुल आयात करण्यात येत आहे.
एका पेक्षा अनेक आसामी या व्यवसायात आहेत. परंतु साधी जप्तीची कारवाई करण्यात येत नही. त्यांचे विरोधात कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिकांचे भुवया उंचावत आहेत. याच सीमेवरून मध्यंतरी गांजा तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी आरोपींना दिली होती. यानंतर ही पोलीस यंत्रणा सावध झाली नाही. पोलीस प्रशासनाला या व्यवसायाची माहिती आहे. परंतु रिक्त पदे आणि कामाचा वाढता व्याप असेच कारण पुढे केली जात आहैे.
बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील पोलीस चौकीत कायमस्वरुपी पोलिसांची नियुक्ती तथा सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण बांधकाम, वनविभागाने नियंत्रणात ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु दोन्ही विभाग ऐकायला तयार नाहीत. असे चित्र परिसरात आहेत. यामुळे नाराजीचा सूर आहे.
पोलीस ठाणेमधील पोलिसांच्या रिक्त जागा तात्काळ भरले पाहिजे. रिक्त जागामुळे तपास प्रभावित ठरत आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
-किशोर राहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता, बिनाखी
सोंड्या टोला प्रकल्पाचे धरण मार्ग मोकळा असल्याने अवैध साहित्यांची आयात होत आहे. याशिवाय हा मार्ग शिकारींना सुरक्षित आहे. जंगलाचे नुकसान याच मार्गावरून होत असल्याने वन विभागाने सुरक्षा करणे आवश्यक आहे.
-देवानंद लांजे, माजी सरपंच, सोंड्या