मिनी मंत्रालयाच्या व्हरांड्यात महत्त्वपूर्ण दस्तावेज असुरक्षित
By admin | Published: December 27, 2014 01:07 AM2014-12-27T01:07:02+5:302014-12-27T01:07:02+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे.
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज चोरीला गेले तर महत्वाची माहिती शोधूनही सापडणार नाही. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेचे लक्ष जात नाही. याला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेले ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती स्तरावरील सात आरोग्य केंद्रांचा कारभार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महत्वपूर्ण दस्तावेज दि.२२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आणण्यात आले. हे दस्तावेज जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा आवारात ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेला चार प्रवेशद्वार आहेत. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण दिशेला हे प्रवेशद्वार आहेत. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारा शेजारी वाहनांमार्फत आणण्यात आले. येथे मजूरांनी दस्तावेज अस्तव्यस्त पध्दतीने ठेवून दिले. दस्तावेजांचे गठ्ठे विखूरलेले असतांना तेथील बहुतांश कागदपत्रे फाटले तर काही चुरडले.
पश्चिम द्वारावर प्रथम खोली ही आरोग्य विभागाच्या संगणक कक्षाची आहे. त्यानंतर साथरोग सर्वेक्षण विभाग आहे. यांच्यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कक्षासह आरोग्य विभागासंबधीत कार्यालय तळमजल्यावर आहे. या कक्षांच्या समोर असलेल्या व्हरांड्यात दस्तावेजांचा ढीग लावलेला आहे. पहिल्या माळ्यावर जाण्यासाठी रस्ता देखील खुला नाही. शेजारीच जिल्हा परिषदेला वीज पुरवठा करणारे संयत्र आहे. स्पार्कींग झाल्यास महत्वपूर्ण दस्तावेज जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता त्यांना ही परिस्थिती दिसून आली. दस्तावेजांची पाहणी करुन काही कागदपत्रे हातात घेतली मात्र कुणीही हटकले नाही. याच परिसरात काही नागरिक आवागमन करित असतांना त्यांनाही विचारपूस केली असता ‘सध्या गुलाबी थंडी पडत असल्यामुळे शेकोट्या पेटविण्यासाठी दस्तावेजाचा वापर करण्यासाठी आले असावे’ अशी उपहासात्मक भाष्य केले.
पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारासमोरच लाकडी साहित्य तथा लोखंडी पत्रे ठेवलेले आढळून आले. मुख्य प्रवेशद्वाराकडून न जाता पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराकडून अनेक कर्मचारी तसेच नागरिक आवागमन करतात. त्यांना अडथळा किंवा इजा होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगणक कक्षात दुपारच्या सत्रात आरोग्य विभागाची बैठक सुरु होती. त्यामुळे व्हरांड्यात असलेल्या दस्तावेजांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. नागरिक त्या दस्तावेजांची पाहणी करीत होते. मात्र कुणीही दस्तावेजाविषयी ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद दस्तावेजांच्या सुरक्षेसाठी किती गंभीर आहेत, याची कल्पना येते. हे येथे उल्लेखनीय.