योजनांच्या अंमलबजावणीत माध्यमांचा महत्त्वाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:53 PM2018-12-21T22:53:53+5:302018-12-21T22:54:14+5:30
शासकीय योजनांची माहिती काही त्रुटीमुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. पंरतू, पत्रकाराच्या वृत्तांकनामुळे अशा योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा पाठपुरावा होतो व माहिती जनतेपर्यंत पोहचते. माध्यम लोकहितोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असून शासन आणि लाभार्थी यांच्या मधील माहितीचा दुवा प्रसार माध्यम आहेत, असे मत जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय योजनांची माहिती काही त्रुटीमुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. पंरतू, पत्रकाराच्या वृत्तांकनामुळे अशा योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा पाठपुरावा होतो व माहिती जनतेपर्यंत पोहचते. माध्यम लोकहितोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असून शासन आणि लाभार्थी यांच्या मधील माहितीचा दुवा प्रसार माध्यम आहेत, असे मत जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय भंडारा यांच्या सहकार्याने, ग्रामीण प्रसारमाध्यम कार्यशाळा ‘वातार्लाप’ चे उद्घाटन शुक्रवारला मंजूषा ठवकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे प्रभारी संचालक अनिल गडेकर, पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते.
प्रसारमाध्यमात डिजीटल क्रांतीमुळे संदेशवहन जलद झाले असून पत्रकारांनी डिजीटल व सोशल मिडीया याचे तंत्रज्ञान आत्मसात करून आपले संदेश वाचकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचवावेत, असे आवाहन प्रभारी संचालक अनिल गडेकर यांनी यावेळी केले. जगात आज स्मार्ट फोनचा वापर हा ८५ टक्के झाला असून मोबाईल असणारा प्रत्येक नागरिक हा एक प्रकारची नागरी पत्रकारिताच करतो आहे. विश्वासर्हता, सकारात्मक पैलू पडताळून पत्रकारांनी माहिती द्यावी, असेही गडेकर यांनी सांगितले.
उद्घाटन सत्रानंतर पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवादासाठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची भूमिका’ या संदर्भात महामेट्रो नागपूरच्या कापोर्रेट कम्युनिकेशन, जनसंपर्क विभागाचे उप व्यवस्थापक अखिलेश हळवे यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण क्षेत्रात मुद्रीत माध्यमाइतकेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महत्व असल्याचे मत मांडले. यावेळी त्यांनी महामेट्रोच्या प्रकल्पाबाबत तसेच भंडारा ब्रॉड गेज मेट्रो बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
विकास पत्रकारितेमध्ये केवळ आकडेवारीवर भर देण्याऐवजी बातमी मूल्याला महत्व देऊन मुख्य समस्येला वाचा फोडणे गरजेचे असते, असे मत ‘विकास संवादामध्ये ग्रामीण पत्रकारांची भूमिका : स्थानिक वृत्त - राष्ट्रीय दृष्टिकोन’ या विषयावर बोलतांना नागपूर येथील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनात प्रसार माध्यमांची भूमिका’ यासंदर्भात मार्गदर्शन करतांना आपले प्रशासकीय अनुभव उपस्थितांसमोर सांगितले. आपत्ती निवारणा नंतरच्या पुनर्वसन कार्यांनाही प्रसारमाध्यमांनी उचित प्रसिध्दी द्यावी,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी, ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका या विषयावर बोलतांना वृत्तपत्राचा वाचकांशी संपर्क असतो पण सोशल मिडीयाची विश्वासार्हता साशंक असल्याने या मीडीयाचा वाचकाशी थेट सबंध येत नाही, असे याप्रसंगी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांनी राजकीय मुद्यांचे वृत्तांकन करण्यासोबतच कृषीमधील यशस्वी प्रयोगांच्या बातम्यांनाही महत्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘ग्रामीण विकासात वृत्तांकनाचे महत्व’ यावर लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे यांनी भाष्य केले. शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये सहाय्यक संचालक शशिन राय यांनी ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’ या विषयावर सादरीकरण करतांना कार्यालयाच्या एकूण कायार्बाबत माहिती दिली. संचालन पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे वरिष्ठ लिपीक निळकंठ आमनेरकर यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले.