‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ला उत्स्फूर्त सहभाग
By admin | Published: May 28, 2017 12:29 AM2017-05-28T00:29:06+5:302017-05-28T00:29:06+5:30
उन्नत शेती - समृद्ध शेतकरी अभियान खरीप पूर्व प्रशिक्षण व किसान (शेतकरी) गोष्टी कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आला.
कृषी तंत्रज्ञानाची माहिती : अधिक उत्पन्नाकरिता प्रोत्साहन
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : उन्नत शेती - समृद्ध शेतकरी अभियान खरीप पूर्व प्रशिक्षण व किसान (शेतकरी) गोष्टी कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आला. २५ मे ते ८ जून या पंधरवाड्यात शेतकऱ्यांना विविध विषयाचे धडे देऊन त्यांना अधिक उत्पन्न कमी खर्चात कसे घेता येईल, या विषयावर मार्गदर्शन सोहळा संत तुकाराम सभागृहात पार पडला.
अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष घनश्याम खेडीकरहोते. उद्घाटन प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे (आत्मा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.जी. लोखंडे, उपविभागीय अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. सांगळे, तहसीलदार राजीव शक्करवार, लाखनी तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके, कृषी अधिकारी वृषाली देशमुख, मंडळ कृषी अधिकारी एम.एन. खराबे, पं.स. सदस्या रजनी पडोळे, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक तथा तालुक्यातील सुमारे ४०० च्या वर शेतकरी बांधव हजर होते.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा खरा उद्देश धानपिकाची प्रत्यक्षात येणारी उत्पादकता व नैसर्गिक आनुवांशिकता यांच्यातील तफावत कमी करणे, शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पिकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, सन २०२२ पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांचे वैविध्यीकरण करून उत्पादन खर्च कमी करणे, कृषी पुरक व्यवसाय, शेतकऱ्यांच्या गटाद्वारे उत्पादक कंपन्यांशी संघटन मजबूत करून व्यवसायीक दृष्टीकोण वाढविणे, पारंपारिकतेल नवीन कृषी तंत्रज्ञानाची संजीवनी देऊन नफा वाढविणे यावर मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी जमिनीची मशागत, माती परीक्षण, बियाणे निवड व प्रक्रिया लागवड पद्धती, सेंद्रीय खताचा वापर, खत व्यवस्थापनातून खताचा वापर, कीड व रोग नियंत्रण या बाबीसह विविध योजनांची माहिती दिली. कृषी तंत्रज्ञान व शेतीविकास योजनाबाबत पालांदूर मंडळ कृषी अर्थक्षेत्र अंतर्गत जेवनाळा, मांगली, इसापूर, कोलारा, कोलारी, पळसगाव आदी गावात ८ जूनपर्यंत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.