भंडारात काँग्रेसचे वर्चस्व तर लाखनीत राष्ट्रवादी युतीची एकहाती सत्ता
By युवराज गोमास | Published: April 29, 2023 04:01 PM2023-04-29T16:01:02+5:302023-04-29T18:04:42+5:30
भंडारात काँग्रेस ९, राष्ट्रवादी युती ६ तर अपक्ष तीन जागांवर विजयी
युवराज गोमासे, भंडारा: भंडारा व लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. प्रत्येकी १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालातही त्याचे प्रतिबिंब उमटले. भंडारात काँग्रेसने सर्वाधीक ९ जागा जिंकल्या, राष्ट्रवादी-भाजपा व शिंदे गट समर्थीत पॅनलला ६ जागा तर अपक्षांनी ३ जागांवर विजय संपादीत केला. लाखनीत राष्ट्रवादी- भाजपा व शिंंदे गट समर्थीत पॅनलने एकहाती १४ जागांवर सत्ता मिळविली. काँग्रेसला फक्त ४ जागांवर विजय संपादीत करता आला.
भंडारा व लाखनी बाजार समितीच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. प्रचारात स्थानिकांबरोबर आजी-माजी आमदारांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मैदानात उडी घेतली होती. दुसऱ्या फळीतील नेते निवडणुकीच्या थेट प्रचारात उतरले होते. समर्थीत पॅनलचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी कसोसीने प्रयत्न करतांना दिसून आले. निवडणुकीत साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर करण्यात आला. यातही सर्वाधीत दाम नितीचा प्रभाव सर्वाधिक दिसून आला.
भंडारा बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान सत्तेला खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा तसेच शिंदे गट एकत्रीत आला होता. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली. लाखनीतही काँग्रेस गठबंधन न करता स्वतंत्र लढली. राष्ट्रवादीने येथेही भाजपा व शिंदे गटाशी युती केली होती. राष्ट्रवादी युतीला लाखनीत मोठे यश मिळाले १८ पैकी १४ जागांवर विजय संपादीत केला. तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले.