कोरड्या मृगाच्या पाठीवर आर्द्राने दिली ओली सलामी; कुठे बरसल्या सरी, तर कुठे वाढविला उकाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:41 PM2023-06-23T12:41:40+5:302023-06-23T12:46:00+5:30
पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांसह जनता आनंदली आहे.
भंडारा : ८ जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राने दगा दिल्यानंतर आता आर्द्राने पहिल्याच दिवशी जिलह्यातील काही भागात ओली सलामी दिली. उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या जीवाला आर्द्राच्या सरींनी दिलासा दिला असला तरी या पावसामुळे उकाडा मात्र वाढला आहे. असे असले तरी, दिवसभर आकाशात ढग दाटून असल्याने आणि पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांसह जनता आनंदली आहे.
गुरुवारी आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील आकाश ढगाळलेले होते. अशातच, दुपारी १:०० वाजतानंतर भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी या तालुक्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. भंडारा तालुक्यात आणि शहरात दुपारी १:०० वाजता सुरू झालेला पाऊस ३:०० वाजेपर्यंत सुरूच होता. त्यानंतरही रिमझिम सुरूच होती.
वरठी वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, मेघगर्जनेसह दुपारी परिसरात तुरळक पाऊस झाला. दमदार पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. उन्हाच्या तडाख्याने तापलेल्या जमिनीला शांत करण्यात पाऊस कमी पडला. तुरळक पावसाच्या हजेरीनेही परिसरातील वीज गेल्याने उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पालांदूर येथे साडेतीन वाजेनंतर बऱ्यापैकी आर्द्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र, प्रचंड उकाड्याने जनजीवन प्रभावित झाले.
पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार
आंधळगाव वार्ताहराच्या माहितीनुसार, सकाळपासून वातावरण ढगाळलेले आणि दमट होते. त्यामुळे पावसाची अपेक्षा असली तरी हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी, आबालवृद्धांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत.
किटाडी वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, किटाडी व परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास विजांच्या भयानक कडकडाटासह वाजत-गाजत पावसाचे आगमन झाले. पाऊण तास मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. त्यानंतरही रिपरिप सुरूच होती. उकाड्यात पावसाच्या सरींनी गारवा आणला. पावसाची चाहुल लागल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाची लगबग वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यासोबतच, पवनी, आसगाव, कोंढा परिसरातही साधारण पावसाच्या सरी आल्याची माहिती वार्ताहरांनी दिली आहे.
पहिल्या पावसाचा लुटला आनंद
पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी लुटला. पावसादरम्यान अनेकांनी शहरातील रस्त्यांवरून बाईक रपेट मारली. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांवरील डबक्यात साचलेले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवीत बच्चे कंपनीने पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.