नशिबाची साथ अन् रात्री रस्त्यावर दिसला वाघ; Video सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 01:45 PM2022-12-25T13:45:50+5:302022-12-25T13:46:51+5:30
कोका अभयारण्यातील घटना, या जंगलात वन्य प्राण्यांची मोठी संख्या असून वाघही मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय बिबट, रानगवा, अस्वल, हरीण यासह अन्य प्राण्यांचा वावर आहे.
मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : जंगलाच्या राजाचे एकदा तरी दर्शन घडावे यासाठी अनेक जण हजारो, लाखो रुपये खर्च करून पर्यटनवारी करतात. जंगल पिंजून काढतात. तरीही वाघाचे दर्शन होत नाही. पण नशिबाची साथ असेल अन अनपेक्षितपणे जंगलाच्या राजाची राजाचे दर्शन होत असेल तर यापेक्षा मोठी बाब नाही. असाच एक व्याघ्र पाहण्याचा योगायोग तीन प्राध्यापकांना शनिवारी रात्री घडला. कोका अभयारण्यातून येत असताना चक्क रस्त्यावरच राजाचे दर्शन झाले.
या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.उमरेड कोका अभयारण्यात शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तीन प्राध्यापकांना चारचाकी वाहनातून प्रवास करताना रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले. त्यांनी हौसेने व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताच चांगलाच व्हायरल झाला. या अभयारण्यात वाघांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर वाघाचे दर्शन प्रवाशांना होत असते. शनिवारी विवेकानंद तंत्रनिकेतन सीतासावंगीचे प्राचार्य इर्शाद अन्सारी, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. कमलाकर निखाडे, प्रा. ऋषभ बानासुरे व चालक पंकज मासुरकर हे तुमसर येथे चारचाकीने परत येत असताना वाघाचे दर्शन झाले.
वन्य प्राण्यांची संख्या मोठी
तुमसर-साकोली रस्ता कोका उमरेड अभयारण्यातून जातो. अतिशय धीम्या गतीने येथून वाहने नेली जातात. हा जंगल अतिशय घनदाट आहे. या जंगलात वन्य प्राण्यांची मोठी संख्या असून वाघही मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय बिबट, रानगवा, अस्वल, हरीण यासह अन्य प्राण्यांचा वावर आहे.