पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 01:08 PM2022-05-02T13:08:20+5:302022-05-02T13:09:01+5:30
वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भाला पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : वाढत्या तापमानाने पूर्व विदर्भातील प्रकल्पांत गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के जलसाठ्यात घट झाली असून ३० एप्रिल रोजी या प्रकल्पांमध्ये ४०.१८ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ५१.३८ टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ४६०७.०१ दलघमी असून सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भालापाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागात मोठे १६ प्रकल्प असून उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ३४६२.९२ दलघमी आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १३७७.५ दलघमी उपयुक्त जलसाठा असून त्याची टक्केवारी ३९.७७ टक्के आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५५.२९ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ६३५.१६ दलघमी असून या प्रकल्पांत सध्या २५३.२९ टक्के जलसाठा असून गतवर्षी ३४.९ टक्के साठा होता. मध्यम प्रकल्पांची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत चांगली दिसत असली तरी हा पुरेसा साठा नाही. पूर्व विदर्भात ३२७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ५०८.९३ दलघमी असून सध्या २२०.७ दलघमी साठा आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ४३.७४ टक्के आहे. गतवर्षी ४५.३२ टक्के जलसाठा होता. वाढते तापमान आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठ्यात घट होत आहे. उन्हाचा मे महिना आणखी बाकी असल्याने जलसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे.
गोसे प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला होता. सध्या या प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा असून गतवर्षी केवळ १५.०३ टक्के जलसाठा होता. या प्रकल्पाच्या उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ७४०.०७ दलघमी असून मृत साठा क्षमता ४०५.९१ दलघमी अशी एकूण ११४६.०८ दलघमी प्रकल्पीय क्षमता आहे. सध्या या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १९५.८ दलघमी असून एकूण साठा ६०१.०७ दलघमी आहे. यासोबत भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पात सध्या २५.८२ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूरमध्ये केवळ ७.१३ टक्के, इटियाडोहमध्ये २०.८६ टक्के, कालीसरारमध्ये ४३.५८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा प्रकल्पात ४५.५१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील आसोळामेंढामध्ये ६१.८५ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ५८.५६ टक्के जलसाठा आहे.