मानेगाव-झबाडा येथे पुन्हा वाघाने केली गोठ्यातील जनावरांची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:34 PM2023-05-18T14:34:01+5:302023-05-18T14:34:23+5:30
ऐन हंगामात पाळीव जनावरांची शिकार होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : भंडारा वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मानेगाव-झबाडा-मेंढा या गावात मागील चार दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. काल मंगळवारीच्या रात्री झबाडा येथील बिसन राघोजी कांबळे यांच्या शेतामधील जनवारांची शिकार केल्यानंतर बुधवारच्या रात्री पुन्हा गोठ्यात शिरून दोन जनावरांची शिकार केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत.
बुधवारी रात्री मानेगाव येथील झिबल फत्तू डोरले यांनी गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली होती. दरम्यान, रात्री वाघाने गोठ्यातील दोन जनावरांची शिकार वाघाने केली. या घटनेमुळे परिसरातील गावकरी धास्तावले आहेत. शेतावर जाणे आणि सायंकाळनंतर अधिक वेळ राहाणे शेतकऱ्यांसाठी आता धोक्याचे झाले आहे. वाघाच्या दशहतीमुळे शेतीच्या मशागतीच्या कामावर परिणाम पडत आहे.
वाघाचा बंदोबस्त करा : गावकऱ्यांची मागणी
वारंवार असा प्रकार सुरू असल्याने गावकरी दहशतीत आहेत. ऐन हंगामात पाळीव जनावरांची शिकार होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील चार दिवसांपासून हा प्रकार सुरू असून आणि वन विभागाला याची कल्पना असूनही वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणतीही हालचार होताना दिसत नाही. यामुळे वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.