पालांदूरात अपुऱ्या मनुष्यबळामुळे बँकिंग व्यवहार प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:04+5:302021-05-09T04:37:04+5:30
राष्ट्रीयीकृत बँक पालांदूर परिसरात एकमेव कवलेवाडा ग्रामपंचायत इमारतीत आहे. सुरुवातीला पाच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहत होती. त्यानंतर दिवसागणिक कर्मचारी, अधिकाऱ्यांची ...
राष्ट्रीयीकृत बँक पालांदूर परिसरात एकमेव कवलेवाडा ग्रामपंचायत इमारतीत आहे. सुरुवातीला पाच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहत होती. त्यानंतर दिवसागणिक कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या कमी कमी होत आज फक्त दोन कर्मचाऱ्यांवर बँकेचे कामकाज चालत आहे. कामाच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे पडत आहे. बँकेतील एखाद्या कामाला सकाळी नागरिक आल्यास दुपारच होते. त्यामुळे परिसरातील लांबपल्ल्याच्या गावचे नागरिक बँकेत यायला अनेकदा विचारच करतात. कामाचा ताण अधिक असल्याने अधिकारी-कर्मचारीसुद्धा ग्राहकांशी सभ्य भाषेत बोलत नाहीत. सामान्य ग्राहकांना जिल्हा प्रबंधकांना संपर्क करणे कठीण होते. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे ग्राहक त्रासलेले आहेत. याकरिता बँक ऑफ इंडिया शाखा पालांदूर येथील कामाचा व्याप बघता अधिकारी, कर्मचाऱ्यांची असलेली उणीव दूर करुन लवकरच समस्या निकाली काढावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कवलेवाडाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील वरिष्ठ प्रबंधांकडे पाठविले आहे.
शासन स्तरावरून शिफारस असलेली पीककर्ज प्रकरणाची विविध प्रकरणे प्रलंबित आहेत. पात्र लाभार्थी योजनेकरीता धावपळ करीत आहेत. खासगी बँकांना अधिकार नसल्याने राष्ट्रीयीकृत बँकेशिवाय बळीराजाला दुसरा पर्याय उरलेला नाही. परंतु राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकृत कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने योग्यवेळी बँकेचे कामकाज होत नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा याविषयात बोलायला तयार नाहीत. त्यामुळे बँक ऑफ इंडियातील सामान्य ग्राहकांची कामे प्रभावित राहत आहेत.
कोट
बँक ऑफ इंडिया शाखा पालांदूर येथे मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. वेळेत काम होत नसल्याने जनसामान्य त्रासले आहेत. याकरिता वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्राची योग्य ती दखल न घेतल्यास उपोषण करणार आहोत.
स्वप्निल खंडाईत,
उपसरपंच, ग्रामपंचायत कवलेवाडा.