उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:52 PM2019-07-08T22:52:46+5:302019-07-08T22:53:09+5:30
राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या तुमसर-गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलावर उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. या प्रकाराने उड्डाणपुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सध्या हा खड्डा तरूणांसाठी सेल्फी पॉर्इंट बनला आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या तुमसर-गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलावर उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. या प्रकाराने उड्डाणपुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सध्या हा खड्डा तरूणांसाठी सेल्फी पॉर्इंट बनला आहे.
२४ कोटी रूपये खर्चून रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावरील सदर उड्डाणपूल क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर बांधण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. अॅप्रोज रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या मार्गावर मोठे खड्डे आहेत. याच उड्डाणपुलावर काही तरूणांना हा भगदाड दिसला. यात या तरूणांनी या खड्ड्यात उतरून सेल्फीही काढली. काहींनी चित्रफितही तयार केली. कंत्राटदाराला माहित होताच रात्रीला भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाच्या बांधकामात फ्लॉयअॅशचा वापर बांधकामात करण्यात आला आहे. पावसामुळे अॅश (राख) वाहून गेल्याने उड्डाणपुलावर पोकळी निर्माण झाली.
मोठ्या दुर्घटनेची शक्यता
देव्हाडी उड्डाणपूलावर भगदाड पडल्यामुळे आतील भागातील राख वाहून गेली. परिणामी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधी रूपये खर्चून उड्डाणपुलाचे बांधकाम होत असताना पडलेल्या भगदाडामुळे बांधकामाची गुणवत्तेवर शंका व्यक्त होत आहे. महामार्ग घोषित झाल्याने वाहनांची वर्दळ राहणार असल्याने निरीक्षण व चौकशी करण्याची गरज आहे. पूल बांधकामाचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्याची गरज आहे.
मागील पाच वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलावर भगदाड पडल्याने रात्रीच्या सुमारास तो बुजविण्यात आला. परंतु संपूर्ण पुलच धोकादायक असल्याचे आम्हाला वाटते.
-श्याम नागपुरे,
माजी सरपंच स्टेशनटोली (देव्हाडी).