इंग्रजी विषयाच्या ऑनलाइन वर्गाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:46+5:302021-06-28T04:23:46+5:30
जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा, धरमपेठ एम.पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेज, नागपूर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर, ...
जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा, धरमपेठ एम.पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेज, नागपूर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर, एस.के. पोरवाल महाविद्यालय, कामठी आणि नबीरा महाविद्यालय, काटोल येथील इंग्रजी विभागांनी संयुक्तपणे या ऑनलाइन वर्गांचे आयोजन केले आहे. ऑनलाइन वर्ग २३ जून ते २ जुलै या कालावधीत घेण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कार्तिक पनिकर यांनी केले. प्रास्ताविकेतून त्यांनी महामारीच्या काळात या ऑनलाइन वर्गांची उपयोगिता स्पष्ट केली. प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात पाच महाविद्यालयांनी सहकार्याच्या भावनेने आयोजित केलेल्या ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षकांनी प्रसंगावधान राखून साथीच्या रोग परिस्थितीचा सामना करीत शैक्षणिक अध्यापन पद्धतीत बदल करून, ऑनलाइन वर्गाध्यापन पद्धतीचा स्वीकार केला, याबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांनी ऑनलाइन वर्गांचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणारी महाविद्यालये आणि भाषा अभ्यास मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ऑनलाइन शिकवणी ही सध्या काळाची गरज आहे. शिक्षकांनी नवीन शैक्षणिक साधनांनी स्वत:ला सुसज्ज केले पाहिजे, तसेच विद्यापीठाला आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्व लाभार्थ्यांना विशेषत: विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. “आमच्या विद्यापीठाचा समृद्ध वारसा आहे, परंतु आपण सर्वांनी येथेच न थांबता, उच्चशिक्षण क्षेत्रातील होणाऱ्या नवीन धोरणात्मक बदलांसाठी आपण स्वत: तयार असले पाहिजे,” असे संबोधित केले.
सहभागी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अखिलेश पेशवे, डॉ.एम. पी.ढोरे, डॉ.एम.बी. बगाडे आणि डॉ.सुनील कुमार नवीन यांनी ऑनलाइन वर्गाचा यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी या वर्गांचा जास्तीतजास्त लाभ घेण्यास सांगितले. डॉ.वीणा जोसेफ, डॉ.अखिलेश पेशवे, डॉ.उमेश बनसोड, डॉ.मनीष चक्रवर्ती, डॉ.एस.के नवीन, डॉ.सविता देवगिरकर, डॉ.श्रद्धा देशपांडे आणि डॉ.मालती पंगा अभ्यासक्रमातील विविध घटकांवर व्याख्यान देणार आहेत. डॉ.गीझाला हाश्मी यांनी संचालन केले, तर डॉ.रेणुका रॉय यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.राजेंद्र पिसे व पाच महाविद्यालयांच्या इंग्रजी विभागाच्या प्राध्यापकांनी प्रयत्न केले.