अपूर्ण ‘फूटवे ब्रीज’चा ग्रामस्थांना फटका
By admin | Published: February 3, 2016 12:36 AM2016-02-03T00:36:53+5:302016-02-03T00:36:53+5:30
तुमसर रेल्वे रोड येथून ग्रामस्थांना रेल्वे स्थानकाबाहेर जाण्याकरिता फुटवे (पादचारी) पूल नसल्याने वारंवार ...
ग्रामस्थांमध्ये असंतोष : शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांना भेटणार
तुमसर : तुमसर रेल्वे रोड येथून ग्रामस्थांना रेल्वे स्थानकाबाहेर जाण्याकरिता फुटवे (पादचारी) पूल नसल्याने वारंवार त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करुन कारवाई करण्यात येते. यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
१२ फेब्रुवारी रोजी रेल्वे महाव्यवस्थापकांना याबाबत ग्रामस्थ भेटून निवेदन देणार आहे. रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांचे दोन ते तीन मार्ग कायम बंद केल्याने त्यांच्यात रोष आहे.
तुमसर रोड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. रेल्वे स्थानकामुळे गावाची विभागणी दोन भागात झाली आहे. रेल्वे स्थानकावर केवळ एकच फूटवे ब्रीज आहे. त्याचा उपयोग रेल्वे प्रवाशीच करतात. या फूटवेचे एक टोक रेल्वे स्थानकात तर दुसरे टोक रेल्वे स्थानकाबाहेर आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जाण्याकरिता गावाला विळखा घालून जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून हा काम सुरू आहे.
रेल्वेने नियम अतिशय कडक केले आहे. रेल्वे स्थानकावर नियमानुसार प्रवेश करतांना तिकीट आवश्यक आहे. परंतु ग्रामस्थांना दररोज दिवसातून अनेकदा ये-जा करावे लागते. प्रत्येक वेळेस तिकीट खरेदी करावी काय? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. रेल्वे प्रशासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात रेल्वे समिती सदस्य आलमखान, प्रा. मोहन भोयर, संजय ताबी, देवसिंग सव्वालाखे, शैलेश ठाकरे, संजय केवट, धनंजय सिंग, अॅड. राजेश राहूल, सरपंच रिता मसरके, सुनिता बिरणवारे, चेनलाल मसरके, विरेंद्र दमाहे यांनी रेल्वे मंत्री, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळाले नाही.
येत्या १२ फेब्रुवारीला रेल्वे महाव्यवस्थापकांचा तुमसर रोड रेल्वे स्थानक येथे दौरा आहे. यावेळी शिष्टमंडळ भेटून पुन्हा निवेदन देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)