तुमसर-बपेरा मार्गावर अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:15 AM2017-11-04T00:15:49+5:302017-11-04T00:16:03+5:30
सिहोरा परिसरात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) च्या अखत्यारित असलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) च्या अखत्यारित असलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. तीन वर्षात साधी रस्त्याची डागडुजी झाली नाही. यामुळे प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून चुल्हाड बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आली आहे.
सिहोरा परिसरात असणारे तुमसर-बपेरा राज्यमार्ग ३० कि.मी. अंतरचा असून महालगाव-नाकाडोंगरी मार्ग २० किमी लांबीचा आहे. ही दोन्ही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) च्या अखत्यारीत आहेत. या मार्गाची तीन वर्षात एक किमी अंतर पर्यंत साधे डांबरीकरण करण्यात आले नाही. यामुळे या मार्गावर रोज अपघाताची श्रृंखला सुरु झाली आहे. या मार्गावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महालगावनजिक संतोष ठाकरे यांचे घराशेजारी असणारी जिवघेणी नाली मृत्युला आमंत्रण देणारी आहे. या नालीने अपघाताचे अर्धशतक गाठले आहे. याच मार्गावर माजी खासदार शिशुपाल पटले आणि जि.प. माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांचे वारपिंडकेपार गाव आहे. या मार्गावर खड्यातून परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गाने पायदळ चालणे कठीण झाले आहे. राज्यमार्गावर जागोजागी नाल्या तयार झाल्याने दुचाकी वाहनाचे अपघात वाढले आहेत. सिंदपुरी शेजारी राज्यमार्गाने अनेकांचे अपघातात बळी घेतले असून अनेकांना अपघातात हात आणि पाय गमवावे लागले आहे. या राज्यमार्गाची साधे डांबरीकरण करण्यात आले नाही. याशिवाय सिहोरा गोबरवाही या १८ किमी लांबीच्या मार्गावर जागोजागी खड्डे आहेत. या मार्गावर एका इसमाचा भीषण अपघात झाला आहे. चुल्हाड - चांदपूर गावापर्यंत जोडणारा ५ किमी अंतरचा रस्ता खड््यात दिसेनासा झाला आहे. या मार्गावर २-३ फुट लांब खड्डे पडली आहेत. सिहोरा टेमणी पर्यंत रस्ता उखडला आहे.
सिहोरा-सिलेगावपर्यंत २ किमी अंतरचा रस्ता नाकी नऊ आणत आहे. मांडवी-परसवाडा गावांना जोडणारा डोक्यावर हात ठेवणारा झाला आहे. महालगाव फाटा ते सुकडी (नकुल) गावांना जोडणारा रस्ता वाढत्या अतिक्रमणाने गिळंकृत होणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात गावांना थेट राज्य मार्गांना जोडणारी रस्ते पुर्णत: टेंशन वाढविणारी झाली आहेत.
१३ व्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बसस्थानकाने १२ रास्ता रोको आंदोलन यशस्वीरीत्या अनुभवले आहे. या रास्ता रोको आंदोलनाने जनतेला न्याय मिळाला आहे. मजुरांना बेरोजगारी भत्ता वाटप प्रक्रिया याच आंदोलनाची फलश्रुती आहे. ही सर्व यशस्वी आंदोलने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांचे नेतृत्वात यशस्वी झाली असून रस्ते विकासाचा अनुशेष तत्काळ भरुन काढण्यासाठी रास्ता राको आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आली आहे.
सिहोरा परिसरात असणारे मार्ग व रस्ते सामान्य जनतेला ये-जा करतांना त्रासदायक झाली आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला असून प्रशासनाची उदासीनता असल्याने चुल्हाड बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
- रमेश पारधी,
माजी उपाध्यक्ष, जि.प. भंडारा