धान्य वितरण व्यवस्था मजबूत करावी
By admin | Published: April 5, 2016 03:22 AM2016-04-05T03:22:20+5:302016-04-05T03:22:20+5:30
गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता
भंडारा : गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता समित्यांच्या नियमित बैठका घेवून त्याची इतिवृत्त प्रत्येक महिन्याच्या मागणीपत्रासोबत जोडावे. तसेच रेशन दुकानदारांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेला धान्यसाठा ग्रामपंचायत तसेच रेशन दुकानामध्ये जाहिररित्या प्रदर्शित करावा, असा सूर आजच्या पहिल्याच जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्य व शासकीय सदस्यांनी व्यक्त केला.
जिल्हा दक्षता समितीवर पालकमंत्र्यांनी निवडलेल्या अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे , अॅड. वसंत एंचीलवार, विठ्ठल बांडेबुचे, राजु गायधने, मिलींद रामटेके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपनिबंधक एस.एन. क्षीरसागर, माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेसंबंधी माहिती सदस्यांना दिली. यापूर्वी जिल्ह्यात गोडावून मधून रेशन दुकानदार धान्य घेवून जात होते. आता एकाच पुरवठादारामार्फत सर्व रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ४०६ प्राधान्य कुटुंब तर ६४ हजार २४९ अंत्योदय कुटुंब आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ८८८ रेशन दुकानदार असून ११७८ किरकोळ केरोसिन विक्रेते आहेत. जिल्ह्यात आधार सिडींगचे काम ८२.२९ टक्के झाले आहे, अशी माहिती अनिल बनसोड यांनी समिती समोर ठेवली. ग्राहकांना वेळेवर धान्य मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या २५ ते ३० तारखेपर्यंत तहसिलदारांकडे मागणीपत्र भरुन दिले पाहिजे. यासह अनेक सूचना अशासकीय सदस्यांकडून करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)