वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 05:00 AM2021-08-29T05:00:00+5:302021-08-29T05:00:31+5:30
भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : समृद्ध वनात भयमुक्त वातावरण असल्याने जिल्ह्यात वन्यजीवांची संख्या वेगाने वाढत आहे. यातूनच आता वन्यजीव आणि मानवी संघर्षाच्या घटनेतही वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसांत वाघाने तीन गुराख्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. रानडुक्कर आणि अस्वलाच्या हल्ल्याच्याही घटना ताज्या आहेत. जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये या घटना सातत्याने घडत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर तुमसर तालुक्यातीलच साखळी येथील भीमराज बिसने या गुराख्यावर २३ ऑगस्ट रोजी, तर आष्टी येथील गुराखी रूपचंद सोनवाने यांच्यावर २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला केला.
तुमसर तालुक्यातील जंगलात वाघांची संख्या वाढल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे तीनही घटनास्थळ एकमेकांपासून दूर आहेत. तीनही ठिकाणी वाघानेच हल्ले केले. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही. यासोबतच रानडुकराच्या हल्ल्यात लाखांदूर तालुक्यातील चिकना येथील रखमा बापू वलथरे ही महिला गंभीर जखमी झाली. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
आमगाव परिसरात अस्वलाचा धुमाकूळ
- आमगाव (दिघोरी) : कोका अभयारण्यालगत असलेल्या आमगाव शिवारात गत पंधरा दिवसांपासून एका अस्वलाने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमगाव परिसराला लागून कोका वन्यजीव अभयारण्य आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. पंधरा दिवसांपासून एक अस्वल शेतात दिसून येत आहे. तसेच गावाशेजारी दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे . आठ दिवसांपूर्वी दिघोरी परिसरामध्ये एका पडीक घरात या अस्वलाने ठाण मांडले होते. या अस्वलाला पकडण्यासाठी प्रादेशिक वनविभागातील कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता. चकमा देऊन त्याने तेथून पळ काढला. तेव्हापासून ते या परिसरात फिरत आहे. अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हल्ल्याची वेळ सायंकाळची
- तुमसर तालुक्यात वाघाच्या तीनही घटना साधारणत: सायंकाळी ४ ते ५ या वेळातच घडल्या आहेत. ही वेळ वाघाची भ्रमण वेळ असते. त्यातही कोणत्याही वाघाने जंगलाबाहेर गावात शिरून कुणावर हल्ला केला नाही. गुराखी जंगलात असताना त्यांच्यावर हल्ला केला आहे.
वनविभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना
- वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावात दवंडी देण्यात आली. कुणीही एकटे जंगलात जाऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या. वनविभागानेही या परिसरात गस्त वाढविली आहे. शेतात जाताना समूहाने जावे, तसेच सायंकाळच्या आत घराकडे परत यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्यात त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.