वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:05+5:302021-08-29T04:34:05+5:30

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध ...

Increase in incidence of wildlife-human conflict | वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

Next

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर तुमसर तालुक्यातीलच साखळी येथील भीमराज बिसने या गुराख्यावर २३ ऑगस्ट रोजी, तर आष्टी येथील गुराखी रूपचंद सोनवाने यांच्यावर २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला केला. तुमसर तालुक्यातील जंगलात वाघांची संख्या वाढल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे तीनही घटनास्थळ एकमेकांपासून दूर आहेत. तीनही ठिकाणी वाघानेच हल्ले केले. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही. यासोबतच रानडुकराच्या हल्ल्यात लाखांदूर तालुक्यातील चिकना येथील रखमा बापू वलथरे ही महिला गंभीर जखमी झाली. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले.

बॉक्स

वनविभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना

वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावात दवंडी देण्यात आली. कुणीही एकटे जंगलात जाऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या. वनविभागानेही या परिसरात गस्त वाढविली आहे. शेतात जाताना समूहाने जावे, तसेच सायंकाळच्या आत घराकडे परत यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्यात त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बॉक्स

हल्ल्याची वेळ सायंकाळची

तुमसर तालुक्यात वाघाच्या तीनही घटना साधारणत: सायंकाळी ४ ते ५ या वेळातच घडल्या आहेत. ही वेळ वाघाची भ्रमण वेळ असते. त्यातही कोणत्याही वाघाने जंगलाबाहेर गावात शिरून कुणावर हल्ला केला नाही. गुराखी जंगलात असताना त्यांच्यावर हल्ला केला आहे.

Web Title: Increase in incidence of wildlife-human conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.