लाखनी वनक्षेत्रात अवैध शिकारीच्या घटनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:29 AM2021-01-14T04:29:15+5:302021-01-14T04:29:15+5:30

वन अधिकारी अनभिज्ञ लाखनी: घनदाट अरण्याने नटलेल्या लाखनी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांचे उदासीन धोरण आणि मुख्यालयी वास्तव्य नसल्यामुळे शिकाऱ्यांचे फावले ...

Increase in poaching in Lakhni forest area | लाखनी वनक्षेत्रात अवैध शिकारीच्या घटनेत वाढ

लाखनी वनक्षेत्रात अवैध शिकारीच्या घटनेत वाढ

Next

वन अधिकारी अनभिज्ञ

लाखनी: घनदाट अरण्याने नटलेल्या लाखनी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांचे उदासीन धोरण आणि मुख्यालयी वास्तव्य नसल्यामुळे शिकाऱ्यांचे फावले असून आठवडाभरात २ रानडुकरांसह १ सांबराची शिकार करण्यात आली असली तरी यापासून वन अधिकारी अनभिज्ञ आहेत. या प्रकाराने तृणभक्षी प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होत आहेत.

लाखनी वनक्षेत्रात गडेगाव, रामपुरी, मुरमाडी/तूप, गोंडसावरी या बिटांचा समावेश होतो. या सर्वच बिटांमध्ये झुडपी जंगलासह मोठ्या झाडाच्या जंगल असल्याने हिंस्र स्वापदासह तृणभक्षी प्राण्यांचाही अधिवास आहे. या वनक्षेत्राचे संरक्षणाची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह क्षेत्र सहायक व वनरक्षकांवर आहे. पण स्थानिक वन कर्मचारी मुख्यालयी राहत नाही पर्यायाने वनात गस्त घालत नसल्यामुळे शिकऱ्यांचा वनालगत वावर वाढला आहे. वनक्षेत्रालगतच शेतजमीन असल्यामुळे रब्बी हंगामात लाख, लाखोरी, जवस, उडीद इत्यादी वाणांची लागवड करण्यात आली आहे. तर काही शेतांमध्ये उसाचे पीकही लावण्यात आलेले आहे. रात्रीचे सुमारास ही पिके खाण्याकरिता तृणभक्षी प्राणी येतात. याबाबत स्थानिक शिकऱ्यांना माहिती असल्यामुळे शिकारी जाळ, गोला किंवा विद्युत प्रवाह प्रवाहित करून तृणभक्षी प्राण्यांची शिकार करतात. ४ ते ९ जानेवारीदरम्यान २ रानडुक्कर आणि सांबराची शिकार केली गेली असली तरी वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यापासून अनभिज्ञ आहेत. वन्य प्राण्यांची शिकार केली असल्याची घटना एका सामाजिक कार्यकर्त्यास माहिती होताच त्याने भ्रमणध्वनीवरून लाखनी वनपरिक्षेत्रातील एका अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनीवर शिकारीबाबत माहिती देण्याकरिता संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. जर या वन अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला असता तर त्या तृणभक्षी प्राण्यांचे जीव वाचले असते. तसेच इतर शिकारीही झाल्या नसत्या. मागील आठवड्यात २ रानडुक्कर व सांबराची शिकार करण्यात आली. याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

लाखनी वनक्षेत्रातील अरण्यामध्ये स्थानिक वन कर्मचाऱ्याबरोबर आम्ही नियमित गस्त घालत असतो. पण अवैध शिकारीचा प्रकार आढळून आला नाही; पण अवैध शिकारीबाबत काही घटना असल्यास नजीकचे वन कर्मचारी किंवा क्षेत्र सहायकाशी संपर्क साधावा अथवा माहिती द्यावी.

डी. के. राऊत, क्षेत्र सहायक, लाखनी

Web Title: Increase in poaching in Lakhni forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.