व्हायरल सर्दी-तापाचे संकट वाढले; रुग्णालयांमध्ये वाढतेय मुलांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:43 AM2021-09-09T04:43:20+5:302021-09-09T04:43:20+5:30
भंडारा : जिल्ह्यात गत महिनाभरापासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, खोकला ...
भंडारा : जिल्ह्यात गत महिनाभरापासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, खोकला यांसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे. अतिसारही डोके वर काढू पाहत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यामध्ये आजारी मुलांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात येते.
बॉक्स
डेंग्यूच्या साथीला अतिसार, हिवताप
अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मुलांपासून ते वृद्धापर्यंतच्या लोकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहे.
साथीचे आजार लक्षात घेता आरोग्य विभाग यंत्रणा सतर्क झाली असून, उपाययोजनेत व्यस्त झाली आहे. वातावरण बदलाने व्हायरल फिवर वाढले आहेत. तापासह आता डेंग्यूच्या साथीला अतिसार व हिवतापही आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
ओपीडीत दररोज ५० ते ६० रुग्ण
जिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, ताप, खोकला असलेल्या जवळपास ५० ते ६० रुग्ण रोज येत आहेत. त्यांच्यावर परिचारकांमार्फत लक्ष ठेवले जाते.
कोट
पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी
वातावरणाच्या बदलामुळे सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात दररोज जवळपास २५० पेक्षा जास्त मुले सर्दी, ताप, खोकला झाल्याने उपचारासाठी येतात. तसेच डेंग्यूसदृश आजाराचीही साथ आहे. पालकांनी स्वच्छतेबाबत काळी घ्यावी.
- यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ, भंडारा