अर्ध जळालेले साहित्य, दुर्गंधी व तारांच्या झुपक्यांमुळे वाढले जलप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:00+5:302021-06-30T04:23:00+5:30
करडी (पालोरा) : पालोरा येथील स्मशानभूमी असलेल्या बांध तलावाला जलप्रदूषणाने ग्रासले आहे. पाण्याच्या काठावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेले शव ...
करडी (पालोरा) : पालोरा येथील स्मशानभूमी असलेल्या बांध तलावाला जलप्रदूषणाने ग्रासले आहे. पाण्याच्या काठावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेले शव पाण्यात टाकले जातात. तसेच लाकडांचे ओंडके, कोळसा, टायरमधील तारांचे झुपके, कपडे व राखेसह अन्य सामग्री तलावात टाकली जात असल्याने तलावात दुर्गंधी पसरत आहे. जलप्रदूषणामुळे मानवासह पशुपक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. सुधारणावादी धोरणांसाठी पुढाऱ्यांनी व ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालोरा येथील स्मशानभूमी असलेल्या बांध तलावातील मत्स्य व्यवसायाचा ठेका केसलवाडा (पालोरा ) येथील आदर्श मच्छीपालन सहकारी संस्थेला आहे. अंत्यसंस्कारास ढिवर बांधवांची हरकत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते. तलावातील पाणी शेतीचे सिंचन, मत्स्य व्यवसाय, मानव, जनावरे व पशुपक्ष्यांसाठी उपयोगी ठरते; परंतु मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या पाण्याला प्रदूषित करण्याला ढिवर बांधवांचा आक्षेप आहे.
बांध तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शासनाच्या निधीतून लाखोंचा खर्च करून स्मशान शेड व बोरवेलचे बांधकाम करण्यात आले; परंतु अंत्यसंस्कारासाठी शेडचा उपयोग केला जात नाही. ग्रामवासीय स्मशान शेड सोडून पाण्याच्या काठावर अंत्यसंस्कार करतात. अनेकदा अर्धवट जळालेले शव पाण्यात टाकून मोकळे होतात. कुजलेले साहित्य दुर्गंधी पसरवितात. अर्धवट जळालेली लाकडे, राख, कोळसा व जळालेल्या टायरच्या तारांचे झुपके जलप्रदूषण करतात. शिवाय मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांना शारीरिक इजा पोचवितात. प्रदूषित पाण्यातील मासोळ्या खाण्यास ग्राहक नकार देत असल्याने कंत्राटदार मच्छीपालन संस्थेचे आर्थिक नुकसान होत आहे.
सुधारणावादी धोरण स्वीकारणे गरजेचे
पालोरा स्मशानभूमी बांध तलावातील गैरप्रकार टाळता येण्यासारखा आहे. स्मशान शेड ठिकाणी अंत्यसंस्कार करून उर्वरित साहित्यांची वेगळी विल्हेवाट लावली जाऊ शकते. थोडी राख तलावात विसर्जित करण्यास काहीच गैर नाही. अंत्यसंस्काराबरोबर पूर्वीप्रमाणे दफनविधीला प्राधान्य देता येण्यासारखे आहे. यामुळे जलप्रदूषणाला आळा बसून मत्स्य व्यवसायातील नुकसान थांबेल. अन्य गावांप्रमाणे स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाला व विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा आदर्श मच्छीपालन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अमरकंठ मेश्राम व ढिवर बांधवांनी व्यक्त केली आहे.
===Photopath===
290621\img_20210629_092654.jpg~290621\img_20210629_092636.jpg
===Caption===
अर्ध जळालेले शव, दुर्गंधी व तारांच्या झुपक्यांमुळे वाढले जलप्रदुषण~अर्ध जळालेले शव, दुर्गंधी व तारांच्या झुपक्यांमुळे वाढले जलप्रदुषण