वातावरणात वाढला गारठा; पारा नऊ अंशाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:11 PM2017-12-28T22:11:33+5:302017-12-28T22:11:51+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारठा वाढला असून गुरूवारला पारा नऊ अंशावर पोहचला़ नागरिक सध्या या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारठा वाढला असून गुरूवारला पारा नऊ अंशावर पोहचला़ नागरिक सध्या या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. गुरुवारला सकाळी किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले़ बुधवारी पारा ८.५ अंशावर होता.
दोन दिवसांपासून शीत लहरी वाहत आहेत. पहाटे कडाक्याची थंडी पडत आहे. दवबिंदूचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागासह शहरातही सायंकाळपासून शेकोट्या पेटत आहेत. या थंडीचा वाहतुकीवर परिणाम दिसत आहे. सकाळची दिनचर्या उशिरा सुरू होत आहे. थंडीमुळे मानवी आरोग्यावर परिणाम झाला आहे. नागरिक आता घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी ऊनी कपडे घालूनच घराबाहेर निघू लागाले आहेत. थंडीची चाहुल फेब्रुवारीपर्यत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
थंडीमुळे सर्दी, खोकल्याचे आजार
दोन दिवसांपासून गारठा वाढल्यामुळे सर्दी-पडशाचे आजार बळावले आहेत. शहरातील रूग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी दिसू लागली आहे. सर्दी, खोकला, पडसे, तापाने फणफणाऱ्या बालकांची संख्या अधिक आहे. वृध्दांना सांधेदुखीचे आजार बळावले आहे. थंडीमुळे विषाणुजन्य आजाराची शक्यता अधिक असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आतापर्यंतच्या कमी तापमानाच्या नोंदी
मागील २५ वर्षात सर्वाधिक कमी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १४ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आली होती. २६ व २७ डिसेंबर २००५ रोजी ६ अंश सेल्सिअस, ३० डिसेंबर २००३ रोजी ९ अंश सेल्सिअस, १७, १८ व २० डिसेंबर २००४ रोजी १० अंश सेल्सिअस, सन २००६ व २००७ मध्ये थंडीचा प्रभाव समप्रमाणात जाणवला होता. २३ नोव्हेंबर २००९ रोजी ११ अंश सेल्सिअस, १८ डिसेंबर २०१० रोजी ८ अंश तर १९ डिसेंबर रोजी ९ अंश सेल्सिअस, ८ जानेवारी २०१३ रोजी ९ अंश सेल्सिअस, सन २०१४ मध्ये ७.५ अंश सेल्सिअस, २०१५ मध्ये ७ अंश सेल्सिअस तर २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते.