ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ
By Admin | Published: November 18, 2015 12:44 AM2015-11-18T00:44:41+5:302015-11-18T00:44:41+5:30
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे भंडाऱ्यात विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून मागील एका महिन्यात ...
विषाणूजन्य आजार : महिनाभरात हजारांवर रुग्ण, परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना
भंडारा : वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे भंडाऱ्यात विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून मागील एका महिन्यात या आजाराने ग्रस्त हजारावर रुग्णांची सामान्य रुग्णालयात नोंद आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयांसह शहरातील अनेक खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढत आहे. आठवडाभर जर ताप असेल व ते चढउतार असेल तर टायफाईड, मलेरिया व इतर आजारांचीही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. डासांच्या उत्पत्तीतही वाढ होत आहे.
डासांसाठी हे वातावरण पोषक असून सायंकाळी घरोघरी डासांचा प्रहार होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे हिवताप, मलेरियाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.
भंडारा शहरात २० ते २५ खासगी रुग्णलये आहेत. काही रुग्णालयाला भेटी दिल्या असता एका डॉक्टरकडे १० ते १५ रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे दिसून आले.
नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवली व ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास टायफाईड, मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर होण्यापासून बचाव करणे शक्य होऊ शकतो, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
एकीकडे वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असताना जिल्हा आरोग्य विभाग उदासीन आहे.
शहरासह ग्रामीण भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून हिवताप विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. कीटकजन्य आजारांना यामुळे खतपाणी मिळत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. (प्रतिनिधी)