वाढते सिमेंटीकरणाचे जाळे भूजलासाठी धोकादायक
By युवराज गोमास | Published: May 20, 2023 07:36 PM2023-05-20T19:36:27+5:302023-05-20T19:37:47+5:30
तलावांत ठणठणाट : ५० वर्षांत कधीही न आटणाऱ्या विहिरीही कोरड्या
युवराज गोमासे, भंडारा : शहरांसह ग्रामीण भागात जिकडे-तिकडे सिमेंटीकरणाचे जाळे विणले जात आहे. रस्ते, नाली, इमारती, अन्य बांधकामेसुद्धा सिमेंट काँक्रिटची होत आहेत. त्यामुळे भूजलाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. गत ५० वर्षांत कधीही न आटणाऱ्या विहिरी आता कोरड्या पडल्या आहेत. पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ जिल्ह्यातील नदी, नाले व तालावांशेजारील गावांवर आली आहे.
निसर्गाच्या रचनेत मोठे बदल करण्याचे तंत्र मानवाच्या हाती लागले. त्याचे चांगले परिणाम हाती आले आहेत. अनेक बाबतींत मानवाने निसर्गातील साधनसंपत्तीचा वापर करून नवनिर्माणाचे नवे कीर्तिमान स्थापित केले आहेत. शहरांत व गावागावांत झालेल्या विधायक कार्यांमुळे चिखलमय रस्ते सुधारले. दळणवळणाची गती वाढली. २० वर्षांपूर्वी गावात कधी न गेलेली एसटी प्रवाशांना घेऊन धावताना दिसत आहे. प्रगतीचे चक्र वेगाने फिरताना दिसत आहे. पूर्वीच्या दगडी व विटांच्या विहिरींना बांधण्यास लागणारा चार ते वर्षांचा कालावधी आता कमालीचा घटला आहे. चार महिन्यांतच विहिरींचे आता खोदकाम होऊन पिण्याचे व वापराचे पाणी मिळते आहे; परंतु मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपाचे दुष्परिणामही अलीकडच्या काळात दिसू लागले आहेत. यावर वेळीच पायबंद अथवा सुधारणा करण्यासाठी गरज निर्माण झाली आहे.
भूजल निरीक्षणासाठी जिल्ह्यात ७४ विहिरी
जिल्ह्यात ३,७१७ चौरस किमी जल सुरक्षित क्षेत्र आहे. भूजल निरीक्षणासाठी ७४ विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. जानेवारी, मार्च, मे, ऑक्टोबर या महिन्यांत विहिरींतील पाण्याची पातळी वर्षातून चारवेळा मोजली जाते. त्यावरून गत पाच वर्षांतील पाणीपातळीची आणि चालू वर्षातील पाणीपातळीची तुलना करून घट व वाढ नोंदविली जाते.
पाणलोट क्षेत्राचा विकास गरजेचा
जिल्ह्यात २५ पाणलोट क्षेत्र आहेत; परंतु पावसाळ्यातील पाणी साठविण्यासाठी पाणलोट क्षेत्रात पुरेशा सुविधा नाहीत. शासनाकडून आवश्यक निधीची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे डोंगर माळरानावर पडणारे पावसाचे पाणी सरळ ओढे, नाल्यांतून वाहून जात आहे. पावसाचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात भूजलात रूपांतरित होत नाही.