मुख कर्करुग्णांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:51 AM2018-11-30T00:51:14+5:302018-11-30T00:51:58+5:30

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय.

Increasing number of mouth cancer | मुख कर्करुग्णांची संख्या वाढतेय

मुख कर्करुग्णांची संख्या वाढतेय

Next
ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २२३ रुग्ण : खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय. अलीकडे खर्रा आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण तरुणाईत प्रचंड वाढले असून यामुळेच भंडारा जिल्ह्यात अवघ्या चार वर्षात ५४२ कर्करुग्ण आढळले असून त्यात मुख कर्करोगाचे २२३ रुग्ण आहे. जनजागृती आणि तंबाखू विरोधी मोहीम राबवूनही तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत कुठेही कमी दिसत नाही. उलट खर्रा, तंबाखू मागणे अलीकडे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी असतांनाही कुणी त्याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही.
कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कर्क रोगग्रस्त रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात धक्कादायक वास्तव पुढे आले. २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षात जिल्ह्यात ५४२ कॅन्सरग्रस्त आढळून आले. त्यात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रुग्ण आहेत. त्यांची संख्या २२३ आहे. त्या खालोखाल स्तनकर्क रोगाचे १२० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १२२, २०१६-१७ मध्ये १२७ आणि २०१७-१८ मध्ये १६० तर २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. तंबाखू, खर्रा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे त्यांना कर्करोगाची लागण झाल्याची या अहवालात म्हटले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अलीकडे तंबाखूची क्रेझ वाढली आहे. सुरुवातीला तंबाखू म्हणून खाणारे आता खर्रा घोटून खायला लागले आहे. खर्रा घोटतांना त्यात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सुपारी आणि तंबाखूचे मिश्रण करुन खाण्याची सवय अनेकांना लागली आहे. खर्रा खाल्ला नाही तर अनेकजण बेचैन होतात. मात्र त्यातून कर्करोगाला आपसूक आमंत्रण दिले जाते.
तंबाखु सेवन करणारे सर्वाधिक ३० ते ४० वयोगटातील
मुख कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत १ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मोखीक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात या मोहीमेअंतर्गत ४ लाख ५१ हजार ८९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात २ लाख ४७ हजार ३५ पुरुष तर २ लाख ४ हजार ८५८ महिलांचा समावेश होता. यापैकी ४४ हजार ६३ जण तंबाखु आणि सुपारी सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्यात ३१ हजार १८७ पुरुष तर १२ हजार ८८६ महिलांचा समावेश आहे. वयोगटानुसार ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे आढळून आले. २४ हजार २० जण तंबाखू, सुपारीचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. या अहवालात जसजसे वय वाढत गेले तसतसे तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.

तंबाखू सोडण्यासाठी हवी इच्छाशक्ती
तंबाखूचे सेवनाची सवय एकदा लागली की ती सुटत नाही. मात्र इच्छाशक्ती असेल तर कुणीही तंबाखु सोडू शकतो. तंबाखूपासून दूर राहण्यासाठी तंबाखू खाणाºयांपासून दुर रहा, तंबाखूची तलफ आल्यास कुरमुरे, चने, शेंगदाणे, लवंग चघळा, मनात १ ते १०० अंक मोजा, मन दुसºया कामात गुंतवा, मी एकदा तंबाखू सेवन केले तर काय फरक पडेल असा विचार करुन एकदा सोडलेला तंबाखू पुन्हा खाऊ नका.

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत अनेकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे पुढे आले. यातून काहींमध्ये कर्करोगाची लक्षणेही दिसून आली. जनजागृती हाच यावरील प्रभावी उपाय असून आता तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. त्यासोबतच शासकीय कार्यालय, महाविद्यालय आदी ठिकाणीही जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-डॉ. मनीष बत्रा, दंत व मुख रोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा

Web Title: Increasing number of mouth cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.