गारांसह अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:40 PM2019-02-15T21:40:19+5:302019-02-15T21:40:39+5:30
आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होताच अस्मानी संकटाने पुन्हा डोके वर काढले. पहिल्या पावसात बळीराजाने हिम्मत दाखवित पीक नुकसान सहन केले. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने हातात आलेले पीक ही जाण्याच्या मार्गावर आले. त्यातच धान खरेदी केंद्रातबाहेर उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याशिवाय गहू, हरभरा, लाख, लाखोरी यासह कठाण पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. भाजीपाला पिकांवर गारपिटीचा चांगलाच दुष्परिणाम दिसून आला.
जवाहरनगर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास वादळी वाºयासह गारपिट व पाऊस बरसला. यात शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भंडारा तालुक्यात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास १० मिनिटांपर्यंत गारपिटीसह पाऊस बरसला. बोरीच्या आकाराच्या गारा बरसल्या.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, बोरीच्या आकाराच्या गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे कठाण पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची धांदल उडाली.
करडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. सदर पावसामुळे पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोका पंचनामा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्यातही पाऊस बरसल्याची माहिती आहे.
वीज कोसळून बैल ठार
साकोली तालुक्यातही विजांच्या गडगटासह पाऊस बरसला. यात पळसगाव सोनका येथील शेतशिवारात बांधलेल्या बैल जोडीतील एका बैलावर वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पशुमालक तुकाराम नारायण कावळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कावळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.