तिबेट स्वायत्ततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:36 PM2018-03-14T23:36:53+5:302018-03-14T23:36:53+5:30
तिबेटमधील आंतरिक परिस्थितीचा विचार करून सर्व देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी चीन सरकारवर दबाव वाढवावा. तसेच भारताची सुरक्षितता या दृष्टीने तिबेटच्या वास्तविक स्वायत्ततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तिबेटमधील आंतरिक परिस्थितीचा विचार करून सर्व देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी चीन सरकारवर दबाव वाढवावा. तसेच भारताची सुरक्षितता या दृष्टीने तिबेटच्या वास्तविक स्वायत्ततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड यांनी केले.
भारत तबेट मैत्री संघ भंडारा शाखेच्या वतीने माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व भारत तिबेट मैत्री संघाचे महाराष्ट्राचे महासचिव अमृत बन्सोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जनक्रांती दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंसोड बोलत होते.
इतिहास तज्ज्ञ प्रा.अश्ववीर गजभिये, डॉ.के.एल. देशपांडे, करण रामटेके, महादेव मेश्राम, एम.डब्लू.दहिवले यांनी विचार व्यक्त केले. चीनने तिबेटला आपल्या अधिपत्याखाली घेतल्यानंतर तिबेट केवळ भौगोलीक दृष्ट््या पारतंत्र्यात नाही. तेथील उच्च सभ्यता बौद्ध संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, भाषा, लिपी, चीन कडून नष्ट करण्यात येत असून पर्यावरणाशी छेडछाड व मानवाधिकाराचे हनन ही फार मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. मुलांच्या जन्मावर प्रतिबंध घालणे, तिबेटी भिक्खूंवर व लामांवर धार्मिक बंधने घालणे, विहार व मठांची तोडफोड करून भिक्खूंना तेथून हाकलून लावणे, त्यांच्या उपासना पद्धतीवर बंदी आणणे, तिबेटी पठारावरून निघणाऱ्या नद्या व हिमनद्यांच्या मार्गात अवरोध निर्माण करणे, भारतातील नद्या प्रदूषित करण्यावर भर देणे, उत्पादन किमतीपेक्षाही कमी किमतीत वस्तू विकून भारतातील कुटीर उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्था संकटात आणण्याचे प्रकार सुरू आहेत.
तसेच तिबेटी मधील चीनच्या क्रूरतापूर्ण व्यवहाराकडे विश्व समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी तिबेट मधील लामा व नागरिकांनी २००९ ते आतापर्यंत १५० च्या वर आत्मदहन केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन भारत तिबेट मैत्री संघाचे उपाध्यक्ष गुलशन गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन मैत्री संघाचे सचिव प्रा.मोरेश्वर गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाकरिता लता करवाडे, आदिनाथ नागदेवे, सुरेश सतदेवे, उपेंद्र कांबळे, असित बागडे, डी.एफ. कोचे, संजय बन्सोड, आनंद गजभिये, सिद्धार्थ चौधरी, इंजि. रुपचंद रामटेके, अरुण अंबादे, ए.पी. गोडबोले, आहुजा डोंगरे, गोवर्धन चौबे, मनोहर गणवीर, नीळकंठ धुर्वे, किशोर मेश्राम, भाविका उके, गौतम कांबळे, माया उके, नरेंद्र बन्सोड, कुंदाताई भोवते इत्यादींनी सहकार्य केले.