त्या रोजगार सेवकावर प्रशासनाचे कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:30+5:302021-07-05T04:22:30+5:30
सडक-अर्जुनी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व साठवण बंधारा दुरुस्ती ...
सडक-अर्जुनी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व साठवण बंधारा दुरुस्ती काम करण्यात आले होते. या कामात रोजगार सेवक सुधीर लेदे यांनी भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार ग्रा.पं. परसोडी आणि नागरिकांनी तहसीलदार सडक अर्जुनी व खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावरून त्या रोजगार सेवकावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व साठवण बंधारा दुरुस्ती कामावरील काही मजूर हे प्रत्यक्ष कामावर नसतानासुद्धा त्यांची नावे ग्राम रोजगार सेवकांनी मंजुरी काढल्याचे ग्रा.पं. व गावकऱ्यांच्या लक्षात आले होते. ल.पा. जि.प. उपविभाग आमगाव या योजनेचे सन २०२०-२१ मधील नाला सरळीकरणाचे काम ३ मार्च २०२१ ला सुरू करण्यात आले होते. ते ७ मार्च २०२१ पर्यंत सुरू होते. या कामावर अकुशल खर्च १२ लाख ६८ हजार ९४५ रुपये दाखविण्यात आला. त्यामध्ये ७० हजार ४५५ रुपये बोगस मजूर दाखवून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनात आले. जे मजूर कधी कामावरच नव्हते, त्यातील काही गावामध्येच नव्हते, अशांचाही समावेश करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने बोगस मजुरांची यादी प्रत्यक्ष जोडून रोजगार सेवक सुधीर लेदे व ल.पा.जि.प. उपविभाग आमगावचे कनिष्ठ अभियंता शैलेंद्रकुमार मेश्राम यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने चौकशी समिती स्थापन करून तक्रारीच्या अनुषंगाने दि. ८ व ९ एप्रिल रोजी ग्रा.पं. कार्यालय परसोडी येथे मजूर, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक व कनिष्ठ अभियंता यांचे बयाण नोंदवून त्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालावरून ग्रामरोजगार सेवकावर कारवाईचे संकेत दिसत आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल खंडविकास अधिकारी पं. स. सडक अर्जुनी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी
तहसील कार्यालयाकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे.
-डी. एस. खुणे, खंडविकास अधिकारी, पं. स. सडक अर्जुनी