अभिनय जीवनातील अविभाज्य घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:02 PM2019-05-08T22:02:22+5:302019-05-08T22:03:27+5:30
मानवी जीवन हा कलेने परिपूर्ण आहे. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगी आपण विविध भूमिका साकारतो. प्रत्येक माणूस हा आपल्या भावना व संवेदना या कृतीतून व्यक्त करतो. भाव एकच असले तरी कृती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने सादर केल्या जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : मानवी जीवन हा कलेने परिपूर्ण आहे. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगी आपण विविध भूमिका साकारतो. प्रत्येक माणूस हा आपल्या भावना व संवेदना या कृतीतून व्यक्त करतो. भाव एकच असले तरी कृती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने सादर केल्या जातात. यालाच अभिनय म्हणत असून अभिनय ही माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. अभिनयाची जोपासणे म्हणजे आपल्या अंगी असलेले विविधरंगी भावाचे सादरीकरण करणे होय. आपल्यात असलेले उपजत गुणांचे सादरीकरण करणे कला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते श्याम धर्माधिकारी यांनी केले.
तथागत पब्लिक स्कूल वरठी येथे शालेय मुले व पालकांसाठी आयोजित एकदिवसीय अभिनय कार्यशाळा प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ सिने आर्टिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व फाईट डायरेक्टर विलास बोबडे, कार्यकारी अध्यक्ष अंजली शिंघनिया, युवा दिग्दर्शक आदित्य बोबडे, संस्थेच्या अध्यक्ष प्रा. विद्या मेश्राम उपस्थित होते.
यावेळी श्याम धर्माधिकारी यांनी मुलांना अभिनय कौशल्य पारंगत होण्यासाठी अनेक टिप्स दिल्या. अभिनय करताना वाक्य रचना व वाक्याची रेलचेल करताना कोणत्या शब्दावर किती जोर दिल्याने वाक्याचे अर्थ कसे बदलतात, याबाबद कृतीतून मार्गदर्शन केले. अभिनय करताना अनेक भाव सहज तेवढेच आकर्षक करताना कसे करावे यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यकारी अध्यक्ष अंजली शिंघनिया व युवा दिग्दर्शक आदित्य बोबडे यांनी चिमुकल्या मुलांना अभिनय क्षेत्रात अनेक संधी असल्याचे सांगून त्यासाठी त्याचे आॅडिशन घेतले. विलास बोबडे यांनी शालेय शिक्षणाबरोबर अभिनयाचे धडे गिरवल्यास आयुष्यात अनेक प्रकल्पात काम करण्याची संधी असून अभिनय क्षेत्रात येण्यासाठी वय नाही तर जिद्द असावी लागते असे सांगितले. यावेळी पालकांना अभिनय कौसल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संचालन शहनाज शेख व प्रास्ताविक आणि आभार प्राचार्य तथागत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास राहुल खोब्रागडे, स्वाती रघूर्ते, प्रीती काळे, पूजा बोन्द्रे, बबिता रहांगडाले, प्रणाली वासनिक, योगिनी लांजेवार, गीता देशमुख, धीरज घोडके, रमेश देवगडे, बाळू मोहतुरे, ज्योती बागडे, रुपाली कावळे, उपस्थित होते.