धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:48+5:302021-08-13T04:39:48+5:30
पालांदूर : हवामानातील बदलामुळे धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव सुरू असून कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू ...
पालांदूर : हवामानातील बदलामुळे धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव सुरू असून कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या असलेले उष्ण दमट हवामान किडींसाठी पोषक असून शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पुरेसा पाऊस नसला तरी महिनाभरापासून जिल्ह्यात रोवणी सुरू आहे. पावसाची रिमझिम हजेरी व मंद वाऱ्याने धान पीक जोमात आहेत. परंतु वातावरणात उष्णता निर्माण झाल्याने दमट वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे धान पिकावर अळीचे फुलपाखरू आढळून येत आहे. पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, खोडकिडीचे आक्रमण धान पिकावर झाल्याचे दिसून येत आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात मध्यम ते अधिक कालावधीचे धान लागवडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुढील महिनाभरात धान पीक गर्भावस्थेत राहील. सध्या धान पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. पावसाची नितांत गरज आहे. मात्र उष्णता अधिक असल्याने व पावसाने दडी मारल्याने रोगराईचे सावट अधिक दिसत आहे. काही ठिकाणी धानावर करपाचे आक्रमण झाल्याचे दिसत आहे.
बॉक्स
खताच्या मात्रा नियंत्रित असाव्यात
शेतकऱ्यांनी अवास्तव अर्थात अनियंत्रित, अमर्यादित, अवाजवी खताच्या मात्रा वापरू नयेत. साध्या धानाला कृषी विभागाच्या शिफारशीनुसार प्रति एकरी ४०:२०:२० या प्रमाणात खताच्या मात्रा द्याव्यात. यात नत्र हे विभागून द्यावे. त्यामुळे पिकाची योग्य ती वाढ होऊन अधिकतम फुटवे येण्यास मदत होते. मुख्य अन्नद्रव्यांसोबत पूरक अन्नद्रव्यसुद्धा द्यावेत. त्यामुळे पिकाला लागणाऱ्या एकूण अन्नद्रव्याची पूर्तता होऊन धान पीक जोमात वाढू शकते. संकरित धानाला प्रति एकर ५०:२५:२५ या प्रमाणात खताची मात्रा पुरवावी. या प्रमाणात खताचे नियोजन केल्यास कीड नियंत्रण, व्यवस्थापन करण्यास मदत होते.
बाॅक्स
कीड नियंत्रणाकरिता उपाययोजना
कार्बोफ्युरॉन हेक्टरी २५ किलो, क्विनोलफास ५ जी एकरी दोन किलो, क्लोरोफायरीफास २० ईसी एक लीटर पाण्याला २ ते २.५ मिली, फिप्रोनील ०.३ टक्के एकरी पाच ते दहा किलो, फरटेरा हेक्टरी दहा किलो यापैकी कोणतेही एक कीटकनाशक खोडकिडी व गादमाशीकरिता वापरता येईल. एकरी दोनशे लीटरचे द्रावण फवारणी अत्यावश्यक आहे. फवारणी सकाळी ८ ते १२, दुपारी ३ ते ६ या वेळेत करावी. दोन ते तीन दिवस बांधानातून पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. असे पालांदूरचे मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी सांगितले.
कोट
शेतकऱ्यांनी पिकाची नीट काळजी घेत नेमक्या किडीची ओळख करून घ्यावी. कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क करून शिफारशीनुसार फवारणी करावी. किंवा दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा. बांधानात खूप अधिक पाणी भरून ठेवू नये. पिकाची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी
कोट
पालांदूर परिसरात शेत शिवारात अभ्यासांती धान पिकावर गादमाशी, खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी आढळून आलेली आहे. शेतकऱ्यांनी वेळीच शिफारशीनुसार कीडनाशक फवारणी किंवा दाणेदार कीटकनाशक वापरावा. धान पीक फुटव्याच्या अवस्थेत असल्याने काळजी घ्यावी.
डॉ. जी.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, साकोली