ऐन श्रावणातील महागाईने सणासुदीचा गोडवा झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:48+5:302021-08-14T04:40:48+5:30
भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण ...
भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण महिन्यात ड्रायफ्रूटसह साखरेचे, तेलाचे दर वाढले असल्याने आता गृहिणींची चिंता वाढली आहे. या दरवाढीचा परिणाम हा मध्यमवर्गीय श्रीमंत व्यक्तींना फारसा जाणवत नसला तरी कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला मात्र दरवाढीने साखरेचा कडवटपणा जाणवत आहे.
जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर साखर कारखाने नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात साखरेचे उत्पादन होत नाही. विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून साखर येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जिल्ह्यात साखरेचे दर हे अधिक आहेत. त्यातच आता झालेली साखरेची दरवाढ ही सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी नाही. चना, शेंगदाणे, साखर, मसाले, गहू, तांदळाचीसुद्धा भाववाढ झाल्याने गरीब, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल-डिझेलने आधीच आपली मर्यादा ओलांडल्याने इतरही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी प्रपंच चालवायचा कसा? असा प्रश्न आहे.
कोट
साखरेसह किराणा साहित्याची झालेली दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाही. साखरेचेच नव्हे तर खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलही प्रचंड वाढले आहे. सामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न आहे. यावर केंद्र शासनाने अंकुश ठेवायला हवा.
दीपाली अविनाश कोटांगले, भंडारा
कोट
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. गरिबांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान गोरगरिबांसाठी तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करायला हव्यात. ऐन श्रावणात साखरेची दरवाढ योग्य नाही.
दीपाली संजय आकरे, खरबी
कोट
सध्या सणांमुळे ग्राहकांकडून साखरेची मागणी वाढत आहे. आपल्या जिल्ह्यात तरी अजून साखरेचे फारसे दर वाढलेले नाहीत. गेल्या काही वर्षात तेल, साबण, साखरेचे रेट हे आवाक्याबाहेर गेले आहेत.
एक व्यावसायिक, भंडारा
कोट
साखरच नाही तर प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चालले आहेत. सरकारला सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. जनताही सर्व निमूटपणे सहन करत आहे. याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.
दिनेश वासनिक, केसलवाडा