महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:15+5:302021-04-12T04:33:15+5:30

अर्जुनी-मोरगाव : ‘अच्छे दिन आएंगे’चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. ‘अच्छे दिन’ तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू ...

Inflation is rampant, farmers are strangled | महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

महागाईचा आगडोंब, शेतकऱ्यांची गळचेपी

Next

अर्जुनी-मोरगाव : ‘अच्छे दिन आएंगे’चा नारा काही वर्षांपूर्वी गुंजला होता. ‘अच्छे दिन’ तर सोडाच मात्र जुने दिवससुद्धा कायम राहू शकले नाहीत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वाढती महागाई अशा दुष्टचक्रात जनता अडकली आहे. वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने लगाम लावावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.

पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या दरात दैनंदिन वाढ होत आहे. तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट बिघडले आहे. गॅस सिलिंडरचे दर गेल्या एक महिन्यात सुमारे दोनशे रुपयांनी वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर त्या प्रमाणात किमती कमी होत नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले.

या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. त्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असे मत परशुरामकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफकोने खताच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. डीएपीच्या किमती ५८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

राज्यातील शेतकरी डीएपीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रब्बी हंगामात अडीच लाख टन तर खरीपमध्ये सहा लाख टनांपर्यंत डीएपीची विक्री होते. १२०० रुपयांना मिळणारे डीएपी १९०० रुपयात मिळणार आहे. १०:२६:२६ हे खत ११७५ रुपयांत मिळत होते. ते आता १७७५ रुपयात मिळणार आहे. तर १२:३२:१६ हे खत ११८५ रुपयाला मिळत होते ते आता १८०० रुपयांना मिळणार आहे. या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारने याचा विचार करून दरवाढीवर नियंत्रण राखावे अन्यथा शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Inflation is rampant, farmers are strangled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.