३५ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:40+5:30
राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी क्षेत्रातील बँकेने एकूण ३५ हजार ३२५ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. कर्जमुक्ती योजनेंतर्गत यादी घोषीत करण्याच्या टप्प्यांतर्गत प्रायोजित तत्वावर भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे.
अशा शेतकऱ्यांचे जमीनधारणीचे क्षेत्र विचारात न घेता त्यांना कर्जमुक्तीचा लाभ सदर योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. याअंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर यादी संबंधित गावांमधील आपले सेवा केंद्र, सीएससी केंद्र, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केली आहे. यात सदर केंद्रांवर जावून आधार प्रमाणिकरण अंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक, बँक पासबूक व आधारकार्ड द्यावयाचे आहे. त्यानंतरच त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
शहापूर व सिल्ली गावांची निवड
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेने त्यांच्याकडील दहा हजार ११० पात्र खात्यांची व भंडारा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २५ हजार २१५ पात्र खात्यांची माहिती एक ते २८ टेम्प्लेटमध्ये भरून शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमधील राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील २४० शेतकऱ्यांची यादी २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली आहे. तसेच २९ फेबुवारीला २५ हजार १० असे एकूण २५ हजार २५० शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. परिणामी आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे.