महिलांना मिळणार योजनांची माहिती
By admin | Published: August 3, 2016 12:30 AM2016-08-03T00:30:25+5:302016-08-03T00:30:25+5:30
महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना सर्व योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी....
तुमसर येथे ६ आॅगस्टला मेळावा : उपविभागीय कार्यालयाचे आयोजन
भंडारा : महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना सर्व योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी तुमसर व मोहाडी येथील भव्य महिला मेळावा तसेच समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात शासनाच्या सर्व विभागांनी सहभागी होवून आपआपल्या विभागाच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात यावेत, अशा सूचना तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाली यांनी केल्या.
तुमसर व मोहाडी येथील मेळाव्याच्या नियोजनासाठी आज उपविभागीय कार्यालय तुमसर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. १ ते ७ आॅगस्ट दरम्यान शासन राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करीत असून या निमित्ताने तुमसर व मोहाडी येथे ६ आॅगस्ट रोजी तालुकास्तरीय मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यात समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्राहक संरक्षण, सातबारा वाटप, स्वच्छ भारत अभियान, महिला व बाल विकास यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात येणार आहे. यासोबतच महिलांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, आहार विषयक माहिती, महिला समुपदेशन, अपघात विमा योजना, विद्यार्थिनींना सायकल वाटप, घरकुल वाटप या योजनांची प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागांतर्गत विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात महिला विषयक कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन व महिलांचे हक्क याबाबत तज्ज्ञ व्याख्यातांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ६ तारखेला सकाळी तुमसर शहरातून विद्यार्थिनींची मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. या मेळाव्यात आधार नोंदणी तसेच ज्या योग्य व्यक्तींना वयाची १८ वर्ष पूर्ण झाली अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
नव्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र वाटप, जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान उज्वला योजना, सोलर योजना, संजय गांधी निराधार योजना, माविमंच्या योजना, आत्माच्या योजना व मनोधैर्य योजना याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
या मेळाव्यास महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सर्व महिलांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक विभागांनी आपल्या योजनांचे स्टॉल लावावेत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केली.
मोहाडी व तुमसर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी व लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)