ओबीसींवर भाजप सरकारकडून अन्याय
By admin | Published: June 23, 2016 12:26 AM2016-06-23T00:26:22+5:302016-06-23T00:26:22+5:30
ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे.
रक्तदान शिबिर : सेवक वाघाये यांचे प्रतिपादन
लाखनी : ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यांना विकासापासून दूर ठेवल्या जात आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी काम करत आहे. तसेच बहुसंख्य ओबीसींना अधिकार व हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.
स्थानिक एका मंगल कार्यालयात ओबीसी समाज सेवा मंडळाद्वारे ओबीसी जनजागृती मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर उपस्थित होत्या. अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहसचिव प्राचार्य बबन तायवाडे जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, नगरपंचायत अध्यक्ष कल्पना भिवगडे, प्राचार्य विलास वाघाये, सरोज वाघाये, नगरसेवक मनोज टहिल्यानी, नगरसेवक अनिल निर्वाण आदी उपस्थित होते.
तायवाडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भाजपा शासन उच्चवर्णीय लोकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप केला.
शेतकऱ्यांना दु:खाचे दिवस भाजपाच्या काळात बघावयास मिळत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संचालन अनिल निर्वाण यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)