संगायो विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची चौकशी करा!
By admin | Published: January 19, 2017 12:29 AM2017-01-19T00:29:29+5:302017-01-19T00:29:29+5:30
कामात हयगय करून तसेच समितीच्या सदस्यांशी अभद्र व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणाची चौकशी करून ...
तहसीलदारांना निवेदन : प्रकरण महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंदचे
तुमसर : कामात हयगय करून तसेच समितीच्या सदस्यांशी अभद्र व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन संगायो समितीने तहसिलदारांना दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. १६ जानेवारी रोजी संगायोच्या आयोजित सभेत समिती सदस्याने शिविगाळ केली तसेच मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे कांगावा करित महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी काम बंद होते. परिणामी अनेकांना आल्यापावली परत जावे लागले.
दरम्यान संगायो समितीचे अध्यक्ष मुन्ना पुंडे, लालु हिसारिया यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन देवून संजय गांधी योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचावा म्हणून स्वत: जिल्हाधिकारी तुमसर पं.स. मध्ये सभा बोलावून निर्देश दिल्याप्रमाणे समिती कार्य युद्ध स्तरावर करित आहे. मात्र या विभागात कार्यरत कर्मचारी हे आपल्या कर्तव्यात हयगय करित असल्यामुळे अनेक गरजू लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. सदर घटनेच्या वेळी पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादीची मागणी केली होती. त्यापुर्वीच तेथील कर्मचाऱ्यांना सभेत यादी ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र हेतु पुरस्पर समितीच्या सदस्याशी तेथील अव्वल कारकून सुनिल लोहारे यांनी अभद्र व्यवहार केला व व्हिडीओ क्लिप तयार केले आहे. समितीच्या सदस्यांना अपमान जनक वागणूक देवून दुसरीकडे कामचुकार करणारेच कर्मचारी मुजोरी करित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. संबंधित कर्मचारीही पुरवठा विभागात कार्यरत असताना उत्पन्नापेक्षा जास्त माया जमविली आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, जे कर्मचारी मुख्यालयात राहत नाही. त्यांच्याकडून घरभाडे वसुल करण्यात यावे, अशी मागणी समितीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात मुन्ना फुंडे, संतोष वैद्य, लालु हिसारिया, गजानन निनावे, गुरूदेव भोंडे, शेखर कोतपल्लीवार, प्रकाश पारधी, संदीप ताले, कैलास जोशी, अशोक उईके, बाल्या मदनकर व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)