वनमजुराची नागपुरात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:03 AM2019-07-11T01:03:01+5:302019-07-11T01:04:43+5:30
कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मोहाडी तालुक्यातील कांद्रीचे वनपरिक्षेत्र आधिकारी देवेंद्र चकोले यांच्या शासकीय निवासस्थानी चार दिवसापूर्वी बिबट्याचे कातडे आढळून आले होते. वनविभागाच्यावतीने सदर प्रकरणाची अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु आहे. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्याकडे वन्यप्रेमी करणार आहेत. कांद्री वनपरिक्षेत्र हे ९५०० हेक्टर क्षेत्रात असून यात १८ बीट आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजिव असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनाधिकाºयाच्या शासकीय निवास्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. मात्र सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. आता वनमजुरांची चौकशी करण्यात आली. मात्र अधिकारी मोकळेच आहेत.
यासंदर्भात दक्षता विभागाच्या अधिकारी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दोन्ही वनमजूरांना नागपूरात पाचारण करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला.