केटीएस रूग्णालयात सुविधांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 12:36 AM2016-07-08T00:36:16+5:302016-07-08T00:36:16+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्वच सोयी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक गैरसोयी असून परिसरातही दारूचे बाटल्या पडलेल्या आढळतात.
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्वच सोयी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक गैरसोयी असून परिसरातही दारूचे बाटल्या पडलेल्या आढळतात. रूग्णांच्या नातलगांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी खा. नाना पटोले यांना केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, केटीएस रूग्णालयात रूग्णांच्या नातलगांना राहण्याच्या सोयीसाठी कँटीनची व्यवस्था करण्यात यावी. रूग्णालयाच्या बाजूला क्वॉर्टर्स असून त्यात १० ते १५ वर्षांपासून काही परिवार राहत आहेत. ते शासनाची वीज व पाण्याचा वापर विनामूल्य करीत आहेत, याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी.
रूग्णालयाच्या आवारात चहानास्त्याच्या टपऱ्या सुरू आहेत. तेसुद्धा पाण्याचा वापर करतात. शासकीय आवारात मागील १५ वर्षांपासून चहानास्त्याची दुकाने चालवितात. शिवाय त्या दुकानांत दारूचे पव्वेसुद्धा उपलब्ध असतात. सकाळच्या वेळी दारूचे रिकामे पव्वे जिकडेतिकडे पडलेले आढळतात.
रूग्णालयाचे कामसुद्धा बोगस पद्धतीने सुरू असून बिलांची चौकशी करण्यात यावी. रूग्णालयातील शौचालये स्वच्छ नसतात. पाणी नसते. तसेच पंखेसुद्धा बंदच असतात. अशाप्रकारची तक्रार खा. नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच त्याच्या प्रतिलिपी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, उपसंचालक आरोग्य सेवा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारकर्त्यांमध्ये संजय डोंगरे, संजय मेश्राम, प्रेमलाल बघेले, संतोष बिसेन, चंद्रकांत मेश्राम, अमोल डोंगरे, छगन जामरे, बी.आर. नेवारे, महेंद्र वासनिक, अजय वोवूरकर, रूपाली अनुले, संतोष नेवारे, शीला भुमके, गोपाल कुसन आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)