नागझिरा अभयारण्यातील वणव्याची चौकशी थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:05+5:302021-05-24T04:34:05+5:30
सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या ...
सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ८ एप्रिल २०२१ रोजी आग लागली होती. आग विझविण्याच्या प्रयत्नात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर गंभीररीत्या भाजलेल्या दोन वनमजुरांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा १७ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अग्निरक्षकांना आवश्यक किट व सुरक्षा उपकरणे पुरविली नाहीत. तसेच फायर लाइनचे काम केले नाही. परिणामी आगीने आतापर्यंत चार वनमजुरांचा बळी गेला. या घटनेला एक महिना लोटूनही या घटनेची साधी चौकशी झालेली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आग नेमकी कशामुळे व कुणामुळे लागली याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
मार्च ते जून दरम्यान प्रत्येक वर्षी आग लागण्याच्या घटना समोर येतात. उन्हाळ्यात आगीपासून वनांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्र सभोवताल आणि वनक्षेत्रातील रस्त्याच्या बाजूचे गवत व लहान काटेरी झुडपे काढण्याचे काम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केले जाते. त्यास फायर लाइनचे काम तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर वॉचरची फेब्रुवारी ते जूनपर्यंत रोजंदारीवर नेमणूक केली जाते; पण अग्निरक्षकांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली जात नाहीत. तसेच फायर लाइन दुरुस्तीची कामे वन अधिकारी आपल्या जवळपासच्या कंत्राटदाराचे नाव समोर करून थातूरमातूर काम मजुरांमार्फत केले जाते. मागील पाच वर्षांपासून शासनाच्या आलेल्या निधीची अफरातफर करून कंत्राटदाराला हाताशी धरून त्या रकमेची वाट लावली जाते. प्रत्येक वर्षी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडतात. यादरम्यान गवत, काटेरी झुडपे, मोहफूल व तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर झाल्यानंतर हे काम सुरू केले जाते.
नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील बफर झोन क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई आहे. तरीही अज्ञात व्यक्ती जाऊन आग लावून पळून जाते तेव्हा वन्यजीव विभागाचे कर्मचारी व अधिकारी काय करतात? पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात आग लागली होती. या घटनेला महिना लोटला आहे.
आतापर्यंत या घटनेत चार मजुरांचा बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका पीडित कुटुंब व परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. एकंदरीत या प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष देऊन आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.