‘ती’ चौकशी थंडबस्त्यात

By admin | Published: May 24, 2016 12:56 AM2016-05-24T00:56:30+5:302016-05-24T00:56:30+5:30

तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला मुहूर्त सापडता सापडेना.

'That' inquiry threw cold | ‘ती’ चौकशी थंडबस्त्यात

‘ती’ चौकशी थंडबस्त्यात

Next

पुन्हा मुहूर्ताची प्रतीक्षा : कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरण
भंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला मुहूर्त सापडता सापडेना. प्रकरण उजेडात येण्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी चौकशी थंडबस्त्यात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र चौकशी समिती तेथे पोहचलीच नाही. चौकशीला बराच विलंब होत असल्यामुळे 'त्या' अधिकाऱ्यांना बड्या अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याची शक्यता बळावली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला अंतर्गत असलेल्या उपकेंद्र दवडीपार येथे २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत लस आढळून आली होती. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान घेतले. मात्र घेण्यात आलेले बयान सार्वजनिक झाले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. बयान सार्वजनिक करणे गंभीर बाब आहे. त्यामुळे जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली. यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत पुन्हा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांच्या बयाणांचे रेकॉर्डिगही केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले होते.
पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे बयान गोपनीय झाल्यासंबधीचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित झाल्यानंतर 'त्या' आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक़ १० मे रोजी चौकशी झालीच नाही. 'ते' अधिकारी वरिष्ठांच्या आशीर्वादाने बिनधास्त आहेत, यात शंका नाही. (नगर प्रतिनिधी)

प्रकरण पोहोचले मंत्रालयात !
पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणाची माहिती मंत्रालयात पाठविण्यात आली. यासंबधी 'लोकमत'ने पाठपुरावा केला होता. मंत्रालयात माहिती पाठविण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली जात होती. मात्र प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रकरणाची माहिती मंत्रालयात पाठविल्याची विश्वसनिय माहिती आहे. तसा उल्लेख देखील माहितीपुस्तकात नोंद केली असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५४९३१०० वर सायंकाळी ५.१६ वाजता संपर्क केला असता त्यांनी 'मिटींगमध्ये आहे, नंतर बोलतो' असे उत्तर दिले.

प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार होती. मात्र बदल्यांची कार्यशाळा, जिल्हा आरोग्य अधिकारी मुबंईत व इतर कामे आल्यामुळे चौकशीसाठी जाता आले नाही. आठवड्याभरात चौकशीसंदर्भात तारीख निश्चित करण्यात येईल. तसे पत्र प्राप्त होताच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल.
- प्रदीप बुराडे,
जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा अध्यक्ष, चौकशी समिती, जि.प.भंडारा.

Web Title: 'That' inquiry threw cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.