ब्रिथ अॅनालायझरअभावी चालकांची तपासणी होईना
By Admin | Published: February 2, 2015 11:00 PM2015-02-02T23:00:16+5:302015-02-02T23:00:16+5:30
भंडारा विभागात सहा आगार असून रापमने येथील चालक व वाहकांची अॅनालायझरने तपासणी करण्यासाठी केवळ दोनच मशीन पाठविल्या आहेत. सध्या या मशीन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आगारात आहेत.
भंडारा : भंडारा विभागात सहा आगार असून रापमने येथील चालक व वाहकांची अॅनालायझरने तपासणी करण्यासाठी केवळ दोनच मशीन पाठविल्या आहेत. सध्या या मशीन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आगारात आहेत.
एस.टी. च्या चालकांना मोबाईल वापरासंबंधीही निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु आज घडीला बस चालवित असताना चालक सर्रासपणे मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. अपघात विरहीत सेवा देण्यासाठी कामावर रूजू होण्यापूर्वी बसचालकांची अल्कोहोल तपासणी करणे एसटी महामंडळाने अनिवार्य केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सहा आगाराकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केवळ दोन ब्रिथ अल्कोहोल अॅनालायझर मशीन पाठविली असल्याने मद्यपी चालकांच्या तपासणीत अडचण येत आहे.
नव्या वर्षातील नियमानुसार कामावर रूजू होण्यापूर्वी प्रत्येक चालकाची तपासणी करणे अनिवार्य असून तपासणीशिवाय बस चालविण्याची परवानगी देता येणार नाही, असा नियम आहे. मात्र, या नियमाला फाटा देत जिल्ह्यातील तीन आगारात केवळ एक मशीन तर गोंदिया जिल्ह्यातील तीन आगारात एक मशीन पाठविण्यात आली आहे. या मशिनद्वारे चालकांची नाममात्र तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास चालकावर निलंबनाची कारवाई होवू शकते.
दिवसेंदिवस एसटीचे वाढते अपघात रोखण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात. मात्र बहुतांश ठिकाणी या योजना आणि नियमांची पायमल्ली होताना दिसते. अपघातास एसटी चालकाच्या चुकीबरोबरच अनेकवेळा नादुरूस्त बसही कारणीभूत असतात. त्यामुळे केवळ चालकांना दोष देवून चालणार नाही तर तांत्रिकदृष्ट्या होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आगारनिहाय शिबिर घेवून चालक व वाहकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल यासाठी एसटीकडून प्रत्यन केले जातात. तसेच उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या चालक आणि वाहकांचा सन्मानही केला जातो. प्रवाशांची सुरक्षितरित्या ने-आण करणाऱ्या चालकांची १ जानेवारीपासून अल्कोहोल तपासणी कण्यात येत आहे. मात्र मशीनअभावी चालकांची नियमित तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. (नगर प्रतिनिधी)